कट्यार आणि चाबकाचा वार
कट्यार बद्दल खूप काही वाचून, जुनं-नावं नाटक आणि त्यातील सगळे आदळलेले संदर्भ झेलून सिनेमा बघायला गेले. गेले, ती एकाच ओढीने, की हे सुवर्णयुग बघता आलं नाही, त्याचं नवं रूप तरी पाहू. पाहिला, आवडला, पण सगळ्या चर्चा, टीका या डोक्यात पिंगा घालत होत्या. पण त्याहीपलीकडे कुठेतरी हे वाटत होतं की फक्त जुनं नाटक, नवं नाटक आणि नवीन चित्रपट यापलीकडे जाऊन कुणी याचा फार विचार करत नाहीये. माध्यम कसंही आणि काहीही असलं, तरी ही कथा अगदी क्लासिक आहे आणि त्यातूनही कलावंताला स्पर्शून जाणारा अहंकार, आणि त्या अहंकाराचा त्याच्यातील कलाकाराशी होणारा लढा ही तर अगदी भौगोलिक मर्यादा ओलांडणारी आणि कालातीत अशी गोष्ट. त्यामुळे कट्यारच्या अनुभवाला माझ्या अन्य एखाद्या चित्रपटाच्या अनुभवाशी जोडायचा प्रयत्न आपसूक मनातल्या मनात झाला, आणि आठवला तो हल्लीच पाहिलेला व्हिपलॅश.
आता या दोघांचा संबंध म्हणाल तर काहीच नाही. मुळात माझ्यासारख्या सामान्य, सांगीतिक ज्ञान नसलेल्या प्रेक्षकाला असे चित्रपट बघून त्यातल्या संगीताचा आनंद पूर्णतया लुटण्याइतकं काही कळत नाही. त्यात या दोघांचे संदर्भ वेगळे, कथेत काही साधर्म्य नाही, संगीत वेगळ्या प्रकारचं इ. इ. पण तरीही, कुठेतरी आपल्यातल्या मानवीपणाला कोणतीही कला हाक देतेच की.. समोर बसून ऐकणं, आणि नंतर आपल्या कामात बुडून जाणं हे या मानवीपणाचं लक्षण. पण कुठलाही कलाकार हा एक वेगळेपण घेऊन आलेला असतो. त्याला मी ‘दैवीपण’ म्हणणार नाही. कारण कलेला सर्व छटा आहेत, आणि त्यात काळ्या छटाही येतात हे मला या दोन्ही चित्रपटांमध्ये दिसलं. फार फार तर कलेला अमानवी म्हणेन मी. आणि त्या आपल्याला न झेपणाऱ्या अमानवीपणाचं अप्रूप, म्हणूनच आपल्याला कलेपेक्षाही कलावंताबद्दल कुतूहल जास्त असतं. आणि त्यातूनच तर कट्यारसारख्या अजरामर गोष्टी जन्म घेतात.
आता आधीच काही डिस्क्लेमर्स. कट्यारला अजरामर म्हणतेय कारण त्याची टिकून असलेली जादू मला दिसतेय. व्हिपलॅशला म्हणत नाहीये, कारण मला अजरामरतेचे निकष स्वत:हून लावता येत नाहीत. या दोघांची थीम हा एकच मला दिसणारा आणि तोही अशक्त दुवा. पण म्हणून त्यांची सर्व बाबतीत तुलना करायचा मला मोह नाही, इच्छा नाही, आणि ते योग्यही नाही. दुसरं, मी नाटकाबद्दल खूप ऐकलेलं असलं तरी पाहिलाय फक्त चित्रपट. त्यातील सूडभावना मूळ नाटकात नाही असं सगळेच सांगतात, पण चित्रपटात ती अगदी ठळकपणे दिसते. त्यामुळे एका चित्रपट पाहिलेल्या व्यक्तीच्या नजरेतून हे पहा. मला संगीतातलं काही कळत नाही. माणूस असल्यामुळे माणूसपण कळतं आणि वाचलेलं आणि अशा चित्रपटांमध्ये बघितलेलं कलाकारांचं कलाकारपण. त्यावर लिहायचा प्रयत्न आहे. निरर्थक वाटल्यास तसं समजा.
तर कट्यारबद्दल असंख्य चर्चा झालेल्या असल्याने त्याची कथा सगळ्यांना माहीत आहेच. व्हिपलॅश मागच्या ऑस्करला नामांकन मिळालेला एक लो बजेट चित्रपट. त्याच्या कथेबद्दल थोडंसं सांगणं मला अगत्याचं वाटतं. एन्ड्र्यू नीमन हा १९ वर्षीय ड्रमर आणि त्याचा अमानुष ट्रेनर फ्लेचर यांची ही कथा. शेफर कॉन्झर्वेटोरी या म्यूझिक स्कूलमधील फ्लेचरचा प्रतिष्ठित स्टुडियो बॅंड. या बॅंड मधे दाखल व्हायला धडपडणारे न्यूयॉर्कमधले सर्वोत्कृष्ट नवोदित वादक. नीमनचं ड्रम वाजवणं ऐकून फ्लेचर त्याला यात स्थान देतो आणि त्याचा कोर ड्रमर होण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेत कधी कोण वरचढ ठरेल सांगता येत नाही. आणि तुम्ही सर्वोत्कृष्ट असण्याच्या कणभर कमी असणं म्हणजे एकतर शिव्यांची लाखोली(जी तशीही अखंड चालू असतेच), मानसिक आणि शारीरिक छळ सहन करणं किंवा बाहेरचा रस्ता बघावा लागणं. यात गुरू-शिष्य दोघेही एकाच पात्रतेचे-चांगल्या आणि वाईट दोन्ही. लयीमधला, तालामधला किंचितसा फरकपण फ्लेचरच्या तुळतुळीत डोक्यावरच्या शिरा ताणतो आणि त्या फरकाचा अपमान वाटून नीमन हात रक्ताळेपर्यंत सराव करतो. या परफेक्शनच्या आग्रहाला कशामुळेच सूट नाही. मग त्यांच्यात येणारी फूट, सूडाचा प्रवास वगैरे होत शेवटच्या अविस्मरणीय सादरीकरणाकडे गाडी पोहोचते. पण या सरधोपट वाटणाऱ्या कथेनंतरही आपण समाधानी होत नाही, हे या चित्रपटाचं यश. सुखासमाधानाने म्हटलं तर संपणारी, म्हटलं तर न संपणारी ही कथा कलेचं कलाकाराशी होणारं अद्वैत आपल्यापर्यंत पोहोचवते. आणि ते न झेपणारं आहे. कट्यार पाहून ती कट्यार काळजात घुसवून आपण निघतो, तसंच या चाबकाचा वारही आपण झेलतो. म्हणून या दोन्हीबद्दल एकत्र काही लिहावंसं वाटलं.
मुळात यांच्यातलं सारखेपण एवढंच, की या दोन्हीमध्ये सगळ्या मानवी मर्यादांवर मात करत शेवटी कला जिंकते. अपयशामुळे, अपराधीपणामुळे आलेली हताशाही दोन्ही ठिकाणी दिसते, आणि ती लपवण्यासाठी अजून आढ्यता, अजून सूडभावना हीसुद्धा दिसते. उगाच स्वप्नाळू कथेसारखं कुणी आपोआप सुधारत नाही. कट्यार चित्रपटाच्या क्लायमॅक्समधे अनेक संवादांमधून जे सांगितलंय त्यातलं बरंचसं व्हिपलॅशच्या क्लायमॅक्समधे ड्रम्स वाजतानाच्या नीमन आणि फ्लेचरच्या हावभावांमधून दिसतं. या सूडाचा प्रवास टिपेला पोहोचल्यावर अत्युत्कृष्ट कलेचा जन्म होतो. आणि ती कला खऱ्या कलाकाराला जागं करते. ती माणुसकीला जागवते हे काही मला पटत नाही. ती फक्त कलाकार जिवंत ठेवते आणि त्याच्या बाकी सगळ्या रूपांना तिलांजली दिली जाते. फ्लेचर आणि खांसाहेब याबाबतीत सारखे आहेत. फ्लेचर काही त्यांच्यासारखा ग्रेट कलाकार नाही, पण तो उत्कृष्ट कलाकार घडवतो, आणि त्याच्या तालमीत आलेल्या प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने आणि त्याच्याच पद्धतीनेच कला साकारायची मुभा आहे. खांसाहेबांचा सदाशिवने गाऊन त्यांच्या घराण्यापलीकडे जाऊ नये यासाठीचा थयथयाट आणि फ्लेचरची वैयक्तिक कारणासाठी का होईना, पण थंड डोक्याच्या सूडाची योजना मला एका जातकुळीची वाटली-कारण दोन्हीमध्ये एका कलाकाराला संपवण्याचा घाट घातलेला होता. या दोघांना कलेची कदर आहे, पण ती कदर करायचं दोघेही त्यांच्या सूडाच्या आंधळेपणात विसरून गेलेत. शेवटी त्यांच्यातला कलेची कदर असलेला कलाकार या सगळ्यावर मात करतो. पण ते त्यांना करायला भाग पाडणाऱ्याचं काय? नीमन आणि सदाशिव या सादरीकरणानंतरही तसेच राहतात? कदाचित नाही. जगण्या-मरण्याच्या सीमारेषेवरील या सादरीकरणानंतर सदाशिव सदाशिव म्हणून जगेल का त्याची कला म्हणून जगेल? त्या शेवटच्या प्रसंगातील खेचलेल्या संवादांनंतर मला याचं उत्तर मिळालं नाही, ते दाखवणं चित्रपटाचा उद्देशही नव्हता. पण नीमनकडे बघून त्याचा विचार करावासा वाटला. त्या सादरीकरणाच्या सुरूवातीला फ्लेचरला बघून त्याला त्वेषाने शिवी देणारा नीमन खांसाहेबांचा खून करायला निघालेल्या सदाशिवसारखाच. पण तो शेवटी फ्लेचरच्या इशाऱ्यावर वाजवतो आणि सदाशिव खांसाहेबांना गुरू मानू लागतो. आपापल्या भावनांवर मात करत हे दोघं त्या अवस्थेला पोहोचतात पण त्यानंतर काय? ही पातळी गाठल्यावर कदाचित त्याच धुंदीत राहणं हाच पर्याय त्यांच्यासमोर असेल. पुन्हा एक कलाकाराचं चिरंतन वेदनेचं आयुष्य. कलेपेक्षा कशालाही अधिक मोल न देणारं, जिवालाही. कट्यारच्या कथेचा उद्देश पूर्ण वेगळा आहे, अगदी मान्य. संगीत जाणणाऱ्यांना, नाटक पाहिलेल्यांना त्या कथेला अनेक पदर दिसत असतील. पण कुठेही असलेल्या कलाकारांचा आसमंतही सारखा आणि त्यात येणारे ढगही सारखे हे मात्र या दोघांच्या तुलनेतून मला जाणवलेलं आणि तरीही निसटलेलंसं वाटणारं काहीतरी..
Comments
Post a Comment