आवर्तन

पावसाची आवर्तनं चालू असताना प्रत्येक थेंबाला जमिनीवर एक कोंब फुटतो, आणि पाणी वेलीसारखं पसरत जातं. अचानक थबकायला होतं, आणि भीती वाटते की आपल्याला येणारी जगाची अनुभूतीच तर चुकीची नाही ना? मी आणि माझ्या नजरेने ठरवून घेतलेल्या रूपांमध्ये ज्याचं जगणं अल्पायुषी वाटतं, त्या त्या रुपांच्या मर्यादेतून बाहेर काढलं, तर त्या पाण्याला एकच गुणधर्म राहतो-वाहतेपण.
या अचानक झालेल्या जाणीवेने क्षणिक काय, नित्य काय, याच्या सगळ्या संकल्पना वाहत्या होऊन जातात. सरपटत जाणारं पाणी सापडेल तिथल्या भेगेत जुनाट वाड्याच्या भिंतींवरील वेलीप्रमाणेच चोरपावलांनी शिरतं, आणि त्या भेगेइतकंच शहारायला होतं. तेच पाणी मातीत झिरपतं, आणि आपल्या मृण्मय शरीरातलं पाण्याचं अस्तित्व जाणवून देतं. एक वेलींचं जाळं, एक तळं, आणि माझा त्याक्षणी तिथे उभा असणारा देह, यातल्या सीमारेषा धूसर वाटू लागतात.
पण ती चिवट वेल जमिनीत रुजते, मी माझ्या देहात अडकलेली, आणि पाणी मात्र मुक्त वाहतं; हे नक्की कोण ठरवतं?
एका स्वरातून दुसऱ्या स्वरात जाताना स्वरयंत्र पायऱ्यांवरून पाणी वहावं तसं जातं, तर सप्तकांच्या बंधनात राहणं त्याला कसं जमतं? का त्याला त्यापलीकडे जाण्याचं स्वातंत्र्यच नाही?
भाषेचा अभ्यास करताना नाम आणि क्रियापद आपापल्या खोल्या सोडून दुसऱ्याच्या खोलीत शिरकाव करताना दिसतात, ते याच वाहतेपणामुळे का? पण मग तरी त्यांचं अस्तित्व त्यांच्या वेगळेपणातच मला झेपू शकतं, हे कसं?
धुवांधार पावसात दगडी भिंतीही विरघळताना दिसतात, तेव्हा माझे डोळे मला फसवतात, का माझ्या त्यांना निश्चित रूप देणाऱ्या संकल्पना?
आणि क्षणात इतकी जाणीवांची उलथापालथ घडवून गेलेला पाऊस संथ लयीत कोसळतच असतो..

Comments

Popular Posts