गोव्यातला बस प्रवास, हा एक विशेष विषय आहे. भरपूर सामान असणं हे बसप्रवास न करण्याचं कारण असू शकत नाही. भरपूर गर्दी असणं हे अपेक्षितच असतं. त्यामुळे ट्रेनने सकाळी लवकर पोहोचवल्यावर बस स्टॉपवर उभी राहिले, तेव्हा मी गोयंकाराला शोभणाऱ्या आरामात उभी होते. बस आली, आणि माझ्याकडचं सामान बघून त्या बॅगांना, आणि त्यांच्यानंतर मला अगोदरच सामानाने भरलेल्या केबिनमध्ये कोंबण्याचा सोहळा झाला. त्यानंतर बस आणि ड्रायव्हरच्या तोंडाचा पट्टा एकत्रच सुसाट सुटले. 

'रोखडे दॅर काड आं... (पुढच्या स्टॉपवर ब्रेक लावता लावता) काड काड, चल चल चल... बेगीन बेगीन...'
(लगेच दार उघड, उघड उघड, चल चल चल, लवकर लवकर)

मला बाहेरून कुणीही काय बोलतंय ते ऐकू येत नव्हतं, इतका आवाज होता. पण ड्रायव्हर एकत्र ड्रॅगनच्या स्पीडने गाडी चालवणे, पोरगेल्या कंडक्टरचं प्रशिक्षण करणे आणि  अखंड बडबड हे सगळं करत होता...
'तू म्हाका सांग नाका, मागीर म्हाका धावंडायतलो तू..'
(तू मला सांगू नकोस, नंतर मला धावायला लावशील तू)

मागील स्टॉपवर घाई केल्याबद्दल कंडक्टरने तक्रार केली असावी असा अंदाज बांधेपर्यंत पुढची सूचना भिरभिरत आली.
'आता कोणा घेय नाका आं, देवय फकत... फकत देवय सांगता तुका... '
(आता कुणालाच घेऊ नकोस, उतरव फक्त, फक्त उतरवायचं सांगून ठेवतो)

हे वाक्य संपेपर्यंत मधेच धाडकन बस थांबली. मी बसल्या जागी माझ्या सामानात आदळले. माझ्याकडे supreme दुर्लक्ष करण्यात आलं. दुरून एक माणूस धावत येत होता. त्याला घ्यायला बस बराच वेळ का थांबवून ठेवली, हे विचारायची कंडक्टरची टाप नसावी. 

इतक्यात गॉडफादरचं थीम म्युझिक जोरात वाजलं. फोन उचलून
'पावलो रे, गुडेर पावलो. कदंबा रेस मारता रे...'
(पोचतोय रे, गुडीला पोहीचलो, कदंबाला रेस मारतोय)

म्हणजे सगळा आटापिटा त्या पुढे चालणाऱ्या सरकारी बस कदंबाला पॅसेंजर मिळू नयेत म्हणून होता हे सिद्ध झालं.

'चंद्रेश्वर कोण देवता?'(चंद्रेश्वरला कोण उतरतंय) हा एक बसला उद्देशून जनरल प्रश्न विचारला गेला, कुणी जे काही उत्तर दिलं ते त्याला ऐकू आलं. त्यावर त्या स्टॉपला किती सेकंद गाडी थांबवायची ते गणित झालं, आणि पुन्हा सुसाट सुटली ती केपेपर्यंत. तिथे कदंबा पुढे उभी होती. 

'अँ... पळयले मरे, आता सगले तितून वतले'
(अँ...(याचं भाषांतर होत नाही) बघितलंस ना, आता सगळे त्या बसमधून जातील)
हे नैराश्य क्षणभरच टिकलं. तिथून पुढे पुन्हा स्पर्धा सुरू.

आता मला उतरायचंय हे माझ्या हालचालींमधून त्याने टिपलं असावं. 
'खंय देवता बाय, सारके देवय रे ताका बॅग आहा न्हु...'
(कुठे उतरणार बाय? नीट उतरव रे तिला, बॅग आहे ना)
ही काळजी माझ्याबद्दल नसून मला बॅग उतरवण्यात उशीर झाला तर काही सेकंद वाया जातील याची होती हे सांगण्याची गरज नाही. 

शेवटी एकदाची या सेनापतीच्या मडगावपासूनच्या सूचना ऐकणारी एकटीच बाय उतरली, तेव्हा हे युद्ध चालू आहे, हे गावीही नसणारी कदंबा मागून रमतगमत येत होती...

Comments

Popular Posts