प्राजक्ताच्या कविता

बहर संपून गेला म्हणून प्राजक्त रिकामा बसत नाही.

पुढच्या पावसापर्यंत,
भामा-रुक्मिणीच्या भांडणात
खडबडीत झालेल्या खोडातून,
आणि खरखरीत झालेल्या पानांतून,
तो चंद्र-सूर्य भिनवून घेतो
सौंदर्यबीज जपणाऱ्या,
त्याच्या कुठल्याशा अंतरंगात.

आणि पुढच्या पावसात,
त्या अंतरंगातून
चंद्राचा वर्ण घेऊन,
सूर्याचा अळता लावून,
राधा उमलते-
मेघश्याम भेटीसाठी.

....

कृष्णकाळ्या रात्रीतून नितळ पाझरतो चांदणझरा.

प्राजक्त टपकतो रुक्मिणीच्या दारात..
आणि रुसलेल्या सत्यभामेची समजूतच काढायला की काय,
स्वर्गातून थेट उतरून येतात,
दवबिंदू.

आणि तिथे अख्खी यमुना राधेच्या मनात,
चंद्र विसरून विसावलेली गूढ काळ्या घनात.


...

स्वर्गातला प्राजक्त त्याने रुजवला म्हणे इथे..

आता तो कृष्णरात्रीत फुलवतो,
आणि रात्र संपताच ढाळतो,
ती फक्त फुलं?-
का त्याच रात्रीत कृष्ण शोधणाऱ्या
कुणा वेदनेची आसवं?

हे त्याला-तिलाच माहीत ना?


-ऋता

Comments

Popular Posts