शब्द

तुम्हाला वाटतं,
की शब्द तुमचे आहेत.

पण पूर्णविरामाच्या उंबऱ्याआड,
वाक्यांचे गोजिरवाणे संसार मांडून देत,
आपल्या कल्पनेच्या स्वकल्पित नाविन्यात,
तुम्ही स्वतःच दंग असता,
तेव्हा हे विश्वासघातकी शब्द,
विभक्तींच्या भिंतींवर
जुन्याच रुढी-परंपरांनी साकारलेली
तुमच्या नवीन कल्पनेची बुरसटलेली आवृत्ती,
निगुतीने कोरून ठेवत असतात.
काळाच्या भल्या मोठ्या पटावर,
तुमचे अक्षांश-रेखांश
या घरांनी
तुमच्या नकळत मांडून ठेवलेले असतात.

शब्द जिंकल्याच्या भ्रमात तुम्ही राहू नका.
तुमचा प्रत्येक शब्द म्हणजे,
काळ-परंपरांच्या अवकाशात,
तुमचं शरणार्थित्व सिद्ध करणारा
एकेक धडधडीत पुरावा!


Comments

Popular Posts