फुलवेडा गोमंतक

संध्याकाळचं चहापाणी पार पडलं, की गोव्यात/कोंकणातल्या गावांमध्ये घराघरातून माणसं बाहेर अंगणात आलेली दिसतात. अंगण ही निवांत संध्याकाळची, शिळोप्याच्या गप्पांची जागा तर आहेच, पण बागेतल्या संध्याकाळच्या फुलांची तर्‍हेतर्‍हेची कौतुकं घराघरातल्या बायांनी करायचीही जागा आहे. कोंकणी स्त्रियांना फुलांचा सोस त्या मातीत जन्माला आल्या आल्या मिळत असावा. प्रत्येक फुलाचा रंग, वास, आकार, अशा प्रत्येक गोष्टीला खुलवून त्यांना केसांमध्ये मिरवायचं, ही सगळी निवांत प्रक्रिया आहे. माझ्याच मित्रयादीत एकापेक्षा एक सुंदर रचना करू शकणार्‍या आणि शकणारे कितीतरी लोक आहेत. माझ्याकडे त्यांचं कौशल्य नाही, पण या अशा अनेक संध्याकाळी माझ्या लहानपणाच्या आठवणीत मात्र भरपूर जागा व्यापून आहेत.


फुलं गोळा करण्यापासून हे कौतुक सुरू होतं. सोनटक्के वगैरे सरळ काढून केसांत माळता येतात (अर्थात आमच्या रिवण गावात त्याच्याही नाजुक वेण्या करणारे कुशल हात आहेत), आणि ती फुलं फुललेली दिसतात. जाई-जुईच्या मात्र नेमक्या आज फुलू घातलेल्या कळ्या ओळखता आल्या पाहिजेत. 'मोन्या' म्हणजे आज न फुलणाऱ्या कळ्या धसमुसळेपणा करून उपटायच्या नाहीत, हमखास ओरडा बसतो. त्यांना नाजुक हाताने ओढून काढलं पाहिजे. मग केळीच्या दोराला (वावळी) भिजवून घ्यायचं. त्यांच्यात या कळ्या फुलायच्या आत गुंफून घ्यायच्या. म्हणजे उशिरा फुलल्या, की गच्च सुरेख 'पड' तयार होतो. अगदीच तुम्ही फारच कंटाळा करत असाल, तर सुई मध्ये ओवून वगैरे, विशेष करून जुईचा गजरा करता येतो. पण तेही केळीच्या धाग्यात. हे विकतचे दोरे म्हणजे प्रचंड अरसिक असल्याची पावती. नैसर्गिक धागेच पाहिजेत, जाईजुईच्या नाजुकपणाला कसला भसाडेपणा चालत नाही, हे लक्षात ठेवायचं.


या जायांचं कौतुक तसंही एकूण भारीच आहे गोव्यात. इथे महाराष्ट्रात, अगदी कोंकणात सुद्धा मी जाईचं अनेकवचन ऐकलं नाही, पण गोव्यात जाईला 'जाईचं फूल' वगैरे म्हणून आढ्य ठरवत नाहीत. त्या आपल्या 'जायो', भरमसाठ प्रमाणात बघायच्या, गुंफायच्या आणि ल्यायच्या. अनेक देवळांमध्ये बांधल्या जाणार्‍या जायांच्या पूजेचे नुसते फोटो बघूनसुद्धा डोळे निवतात. रस्त्यारस्त्यांवर हे पड 'जायो जाय गे' म्हणत विकणार्‍या स्वतः केसांत भरगच्च फुलं माळलेल्या अस्तुऱ्यांकडून सहजच आपल्या घरी, आणि आजूबाजूच्या सगळ्यांना देण्यासाठी म्हणून विकत घेतले जातात. 


मग तसेच अबोलीचे प्रकार. हिच्याकडे रंगाशिवाय दुसरं काही नाही. त्यामुळे भरपूर फुलणारी 'पिशी' बाई, आणि जरा पेस्टल शेड जपत शक्य तेवढी केशरी दिसणारी 'रतन' यांना अधून मधून हिरव्या रंगाने सजवत बोलतं करायचं. दोघातिघांनी मिळून खूप गप्पा मारत गोळा करून ओतलेल्या अबोलीच्या राशीइतकं दृष्टीसुख फार कमी गोष्टींनी मिळतं. त्यांची 'फांती' हा कलाकुसरीचा अजून एक नमुना. 


रंगाची उधळण असणारी कोरांटी म्हणजे 'गोठलां'. यांची वेणी करणे ही अशीच एक नेत्रसुखद प्रक्रिया. यांचे लांब आणि लवचिक देठ असल्याने संध्याकाळी काढून एकाच दोराचे कशाभोवती तरी गुंडाळून दोन पेड करायचे, आणि त्यात गुंफायची. यातलं कशाभोवती तरी म्हणजे, देवाला घालायची असतील तर कसल्यातरी खुंट्याला, आणि केसांत माळायची असतील तर आपल्याच पायाच्या अंगठ्याभोवती. ही फुलं दुसर्‍या दिवशी सकाळी फुलतात, आणि आपापल्या गंतव्य स्थानी जातात.


संध्याकाळची फुलं म्हणायची, आणि 'शब्दुली' (म्हणजे मराठीत गुलबक्षी) चं नाव घ्यायचं नाही असं कसं चालेल? रंगांची उधळण असते यांच्यात अक्षरशः. त्यांची वेणी बर्‍याच ठिकाणी प्रेमाने करतात. या पुष्पप्रशिक्षणात पहिली रचना शिकवतात ती बहुतेक याचीच असते. देव, आणि घरातल्या देवीचे केस, अशा दोन्ही ठिकाणी लाल, पिवळा, केशरी, दुरंगी असे अनेक रंग मिरवत ही फुलं गणपतीच्या दरम्यान भरपूर दिमाख करतात.


अनेक फुलं खरं तर सांगायची राहून गेली आहेत. पण गोव्यातल्या स्त्रियांना कुठचीही फुलं दिली, तरी त्यांचं अपार कौतुक होतं, एवढाच खरा मुद्दा. अंगणातली संध्याकाळ हा त्यांचा या रंग-गंधाच्या सोहळ्याशी होणारा संवाद घेऊन येते. अर्थात आता हे दृश्य थोडं कमी दिसत असेल. पण प्रत्येकाच्या अंगणातली जुनी फुलझाडं अजून नक्कीच असतील, आणि ती जिवाच्या आकांताने फुलत असतीलच. आत्ता ज्यांना जमत नसेल त्यांना ती परत कधीतरी नव्याने भेटतील, इतके त्यांच्याशी अनेक पिढ्यांचे ऋणानुबंध नक्कीच जुळलेले आहेत.


-ऋता




Comments

Popular Posts