वोवळां

गोव्यात घर असल्याने घरच्या फोनवर माणसांच्या इतकेच (किंबहुना कधीकधी जास्तच) झाडां-फुलांचे संदर्भ असतात. त्यातला सध्याचा अतिमहत्त्वाचा चर्चेचा मुद्दा म्हणजे 'ओवळं' किंवा शुद्ध कोंकणीत 'वोवळां'. तुरळक प्रमाणात, म्हणजे एखाद दुसरा सर मिळत असला तरी काल एकदाचे निरनिराळ्या ठिकाणाहून भरपूर सर आईला मिळाले, आणि त्याचे फोटो मला पाठवून ती आणि फोटो मिळवून मी कृतकृत्य झालो. मग 'अरे ही पांढरीशुभ्र फुलं होती ती ओवळ जास्त फुलत नसे ना?' 'हो, पण ती फुलते आता चांगली' वगैरे आढावा घेऊन झाला. आता अडीच वर्षांच्या भाचीला दाखवायला नेलं पाहिजे बहर आहे तोवर वगैरे ठरवून झालं. हे सगळं झाल्यावर ते सर बघून सरसरून आलेल्या आठवणी मात्र रेंगाळत राहिल्या.




ओवळांच्या आठवणी सर्व फुलांच्या आधीच्या, कारण ती फुलं गोळा करायलाही सोपी आणि ओवायलाही. आम्ही जिथे राहत असू तिथे रिवण गावात भलं मोठं झाड होतं ओवळीचं. पहाटे आम्ही लहान मुलं तिथे 'ओवळं पुनवायला' म्हणून जायचो. जमीन झाकली जाईल इतका सडा तिथे कायमचाच. भरपूर वेळ काढून माडीच्या (पोफळीच्या) पोवलीत (पोय) भरतील तितकी फुलं गोळा करून रमतगमत घरी यायचं. माडाच्या झावळीच्या धाग्यात फूल घातलं, की सर्रकन खाली उतरत असे. असला सोपा सर चुकायचा काही प्रश्नच नाही. फुलं आणि वेळ दोन्हींची काही कमतरता नसेच, त्यामुळे भरपूर वेळ हे प्रकरण चालणं नेहमीचंच. 


गावात हे झाड नंतर गेलं, तरी कुणाच्यातरी घरी ही फुलं असणारच आणि मिळणारच. आणि कुठे नाही तरी रस्त्यावर फुलांचे सर विकायला उभ्या असलेल्या मुली तरी निश्चित असतात.मामाच्या इथे नदीवर बकुळ आहे. पाण्यात पडून वाहत येणारी पांढरीशुभ्र फुलं, हे तिथलं तिचं रूप. कोंकणात, गोव्यात आणि कर्नाटकातही एकूणच बकुळीचं कौतुक फार.एखादी गोष्ट भरपूर प्रमाणात मिळत असली, की ती तशीच राहणार असा समज होणं हा नियम फुलांनाही लागू होतोच. तसा पुण्यात आल्यापासून ओवळांचा वनवास सुरू झाला तो अनपेक्षित होता. इथे तशी खूप अंग भरून फुलणारी बकुळ मला तरी भेटली नाही कुठे. तुरळक प्रमाणात कुठे कुठे दिसते, पण कायम हातचं राखून, काहीशी घाबरून, बावरून फुलणारी. त्यामुळे बकुळीच्या हक्काच्या प्रदेशात गेले आणि फुलं मिळाली की प्रमाणाबाहेर हरखून जायला होतं ते अजूनही. कर्नाटक फील्डवर्कमध्ये रस्त्यावर सर विकायला उभी राहिलेली मुलगी दिसली तेव्हा अख्ख्या टीमला थांबायला लावून सगळेच्या सगळे सर विकत घेतले होते. गोव्यात लग्नात बकुळीचे हार असणं गरजेचं असतं. भावाच्या लग्नात सीझन नसल्यामुळे सगळ्या गडबडीत चुलतभाऊ कुठून कुठून धुंडाळून भरपूर सर मिळवून घेऊन आला आणि 'ही घे तुझी भेट' म्हणून अख्खी रास माझ्या हातात टाकली, तेव्हा असाच केवढातरी आनंद झाला होता. फुलांची देवघेव, विशिष्ट फुलं आवडणार्‍या लोकांना ती नेऊन पोहोचवणे वगैरे उद्योग तर गोव्यात रोजचेच असतात आणि गोवा सोडून एक तप उलटून गेलं तरी या असल्या आठवणींमध्ये अडकून राहणं काही सुटत नाही. त्यामुळे फोटोत का होईना, एकदाचे भरपूर सर दिसले की जीव शांत होतो. 


बकुळीचं कौतुक अनुभवायचं असेल, तर अशीच शेकडोंच्या संख्येत पाहिजेत ती फुलं. रंग, गंध वगैरे सगळं ठीक आहे पण ती विपुल प्रमाणात फुलली/मिळाली नाहीत तर अजूनही काहीतरी अन्याय झाल्यासारखं वाटतं- एखाद्या गुणी कलाकाराला व्यासपीठच मिळू नये तसं. तिला तिची जागा मिळाली, की एका जागी उभं असूनही रसरसून, भरभरून जगायची किमया तिला बरोब्बर साधते. सारख्याच असोशीने प्रत्येक क्षणाचे सोहळे करणं हा तिचा स्वभावधर्म. वाळून गेल्यावर सुद्धा हा स्वभाव सुटत नाहीच, आणि फुलांचा वास काही जात नाही. या असल्या अट्टाहासाने जगणाऱ्या झाडांशी लागेबांधे जुळलेले असले, की बाकी सगळं मागे पडल्यावर त्यांचेच संदर्भ लक्षात राहणं हे साहजिकच घडतं. माणसांच्या हौशी, आठवणी, गरजा यांच्यापलीकडे सुद्धा चिक्कार शिल्लक राहणारी नितांत निरागस फुलं ही. ओंजळ भरभरून घेता यावीत इतकी तरी नेहमी भेटत राहोत. अजून दुसरं लागतं तरी काय?




-ऋता

Comments

Post a Comment

Popular Posts