अदृश्य सरस्वती
काल आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस झाला. जाणीवपूर्वक भाषा जपणाऱ्या लोकांपर्यंत नक्कीच त्याचं दिनवैशिष्ट्य पोहोचलेलं असणार. त्यात भर घालता येण्यासारखं माझ्याकडे काही नाही.
ही पोस्ट आहे ती मात्र मातृभाषेबद्दल खूप जाज्वल्य अभिमान वगैरे नसणार्या लोकांबद्दल- भाषाभ्यासक म्हणून आलेल्या मर्यादित अनुभवांवरून लिहिलेली.
पण याला पार्श्वभूमी म्हणून माझाच अनुभव. आमच्या समाजाची विशिष्ट बोली मला येत नाही. काही वृद्ध स्त्रिया सोडल्या, तर मी कधी ती कुणी बोललेलीही विशेष ऐकली नाही. गोव्यातल्या निरनिराळ्या भाषाविषयक प्रवाहांच्या रेट्यात मराठीभाषक कधी झाले, आणि पुण्यात येऊन त्या गोवा-विशिष्ट मराठीचे हेलही कधी गमावून बसले ते कळलंच नाही. आमची बोली गमावली, मराठीचे हेल गमावले, आणि कोंकणी बोलता येते याचा गर्वसुद्धा एकदा एका सहलीत बस ड्रायव्हरने उतरवला- बाय, तुजी कोंकणी GA न्हीं, MH शी दिसता (बाय, तुझी कोंकणी GA नाही, MH असल्यासारखी वाटते🤦♀️)...
भाषा बदलते, याबद्दल शोक व्यक्त करणारी मी नाही (ती बदललीच नाही तर मी काम काय करणार?) पण व्यक्तिमत्वातला एकेक पापुद्रा गळत गेला, तसं एकेक भाषावैशिष्ट्याचं अस्तर पण त्याच्यासोबत गळून गेलं. खूप उशिरा झालेल्या जाणिवा तेवढ्या राहिल्या.
आणि अशा ठसठसत्या जाणिवा भेटल्या त्या मराठी-कन्नड सीमाभागात फिरताना. तिथली भाषा ढाल-तलवार घेऊन थेट युद्धात उतरू शकते हे माहीत आहे, पण दिसायला तेवढीच कमालीची निरागस आणि गोड. ज्या गटातून गेले होते, त्या आम्हा सर्वांचा अभ्यास फक्त व्याकरणापुरता मर्यादित. पण नुसती भूतकाळाची रूपं मिळवायला विचारलेल्या प्रश्नांना निरनिराळ्या भाषांमध्ये, भाषांच्या आणि भाषांमुळे घडलेल्या निरनिराळ्या कथा इकडे कानावर पडत राहिल्या.
माझ्या लक्षात राहिल्या त्या मात्र हे असलं काही गावीही नसलेल्या दोन सख्ख्या शेजारणी. एक कन्नड, एक मराठी. दोघींना एकमेकींची भाषा बोलता येत नव्हती . मात्र, मी मराठीत विचारलेले प्रश्न मराठी बाई मराठीतच कन्नड बाईंना 'समजावायच्या', आणि त्या कन्नड उत्तर द्यायच्या ते त्याच मराठीत मला सांगायच्या. तो इंटरव्ह्यू कसा पार पडला हे आजवर माझं मलाच कळलेलं नाही! कुणीतरी सीमेवर युद्ध करत असताना कुणीतरी शांतपणे शेतीची मशागत करत असतं हे ज्ञान मात्र काही असेच इंटरव्ह्यू देऊन गेले.
पुढे अशी मशागत करणारेच भेटत गेले. कोर्लई गावात पोर्तुगीज क्रियोल बोलणारी छोटीशी वस्ती. जुन्या काळात काम करून गेलेल्या एका भाषाशास्त्रज्ञामुळे त्यांना आपली भाषा काहीतरी विशेष आहे हे नक्की माहिती आहे. इथली गंमत अशी, की चर्चमधली, शाळेतली, गावातली भाषा मराठी आणि यांनी मात्र आपली विशेष भाषा नीट बोलती ठेवलेली. 'तुमच्या भाषेला काय म्हणता' हे विचारताक्षणी 'क्रियोल' असं लग्गेच उत्तर मिळालं होतं. चर्चने त्यांच्यासाठी समाजोपयोगी उपक्रम म्हणून 'पोर्तुगीज शिका' क्लास काढले, आणि अठराव्या शतकानंतर प्रत्यक्ष पोर्तुगीज जगाशी काहीच संबंध न राहिलेल्या यांनी ती आधुनिक पोर्तुगीज ऐकून तिच्याकडे सपशेल पाठ फिरवली! त्यानंतर बरीच वर्षं लोटूनही निरनिराळ्या माध्यमांतून त्यांची मातृभाषा कुठल्याही आधाराशिवाय सुखेनैव नांदते आहे, हे ऐकून त्या चिमुकल्या समाजाचं कौतुक वाटतं.
नंतर भेटले ते मात्र शतकभरापूर्वी समुद्र उल्लंघून गेलेले लोक. रायगड-रत्नागिरीतील गावांमधून थेट दक्षिण आफ्रिकेत जाऊन स्थायिक झालेल्या लोकांनी भाषेची किती रूपं दाखवावीत! दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांच्या पाच मुख्य भाषा, आणि त्यांच्या पाच तर्हा. त्यात या दोन जिल्ह्यांमधून गेलेल्या लोकांची संख्या ती केवढी असणार. पण यांनी दुकानांची नावं ठेवावीत 'जंजिरा', नाहीतर आपल्या भागातल्या रस्त्याला नाव मिळवावं आपल्या कोंकणातल्या गावाचं. मी नुसती त्यांच्या गावात जाऊन आले हे सांगताच साठ वर्षं भारत न बघितलेल्या एका काकांचे डोळे डबडबून यावेत, आणि गावच्या खुणा आठवताना त्यांना विसरलेली भाषा आठवावी. त्यांच्या बायकोने त्यांच्यामागे 'तुझ्यासंगत मोप बेस आपली बात करतात, माझ्यासंगत नाय करत' असली तक्रार करावी. माझ्यासाठी शोधून शोधून अजूनही कोकणी बोलू शकणारे लोक सर्वांनी कामं सोडून शोधत बसावेत, आणि मी त्यांच्या कोकणीत एक संपूर्ण वाक्य स्टेजवर बोलले म्हणून अख्खी concert दणाणून सोडावी. परीक्षा दिल्यासारखे कोकणी आठवून आठवून इंटरव्ह्यू देणारे, आणि नंतर एकदा आठवल्यावर 'मला आज हे वाक्य आठवलं, ही रेसिपी आज मी कोकणीत सांगितली माझ्या गावातल्या बहिणीला' म्हणून हरखून मेसेज करत बसणारे कितीतरी लोक. माळ्याची हरवलेली किल्ली सापडावी, तशी भाषा नव्याने सापडली बर्याच लोकांना. आणि मग जुन्या आठवणींचे पेटारे उघडले गेले, आणि कुठच्यातरी नशिबाने ते बघायला मला मिळाले.
माझे हाडाचे समाज-भाषाशास्त्रज्ञ असणारे गाईड म्हणतात, तुमच्या समोरची व्यक्ती बोलती झाली ना, की भाषेचा डेटा नाही मिळाला तरी चालेल. आपण त्यांच्याकडून इतकं घेतो, की ऐकायला एक कान, एवढंच आपण त्या समाजाला परत देऊ शकतो.
असा कान दिल्यावर ऐकू येत राहतो तो भाषेच्या अदृश्य सरस्वतीचा वाहतेपणाचा आवाज. भाषेच्या जाणिवेत भाषा जपली जाण्याची बीजं असतात, आणि जपलेल्या भाषेत नव्याने जाणिवा होण्याची. अदृश्य नदी कुठलं बीज शिंपून कधी रुजवेल हे कोण ठरवणार?
मातृभाषा दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा!
-ऋता
Comments
Post a Comment