झुंबरमाळा

आभाळ खूप भरून यावं, आणि पावसाचा मात्र मागमूस नसावा तसं काहीसं झालं होतं. भोवतालचं जग ज्या परिस्थितीत, त्यातच थोड्याफार फरकाने मीही. शहाणपणाचा स्वघोषित मक्ता घेतलेल्या बेटांनी लाटांची संवेदनशीलता मोजायचे दिवस होते ते. अन्य आवाज दडपून टाकायच्या आक्रस्ताळी अट्टाहासांना पाहून भरून आलेल्या आभाळाने माघार घ्यायचीच.

अशा शरणागत मनाला वाहतं करायला निमित्त ठरला बहावा. दर आठवड्याला अत्यावश्यक सामान आणायला बाहेर पडल्यावर नवीन रूप दाखवणारा अमलताश. त्या रस्त्यावर पोहोचताना मागच्या आठवड्यात याला तांबूस लुसलुशीत पालवी होती हे आठवेपर्यंत बहाव्याने हिरवीगार पोक्त पाने मिरवत उभं असावं. पुढच्या वेळी त्या पानांमध्ये पिवळे चुकार तुरे दिसू लागावेत, आणि त्यापुढच्या वेळी जर्द पिवळ्या माळा लेऊन त्याने आसमंत हळदुवा करून टाकावा. दर आठवड्याला निराळं देखणेपण.


मागचे काही दिवस ते जर्द रूप फिकुटल्यासारखं झालं होतं. आज बाहेर पडले तर काही दिवसांपूर्वीपर्यंत दिमाखाने सळसळणाऱ्या पाकळ्या झडझडून गाळून टाकून बहावा निर्विकारपणे उभा. त्याक्षणी निसर्गाचा विलक्षण हेवा वाटून गेला...

आत्मभान आणि आत्ममग्नता यांच्यातली पुसट रेषा निसर्गातील प्रत्येक घटकाला नेमकी कशी सापडत असेल? बहावा पाहून अलीकडच्या काही स्मृतींचे चित्रक्षण नव्याने सुस्पष्ट झाले. लॉकडाऊनच्या आधी काही कामानिमित्त बाहेर गेले असता संचेतीजवळचा अंगभर फुलून आलेला शिरीष आठवला. आजच दिसलेला कदंब फुलायची तयारी करायला लागलेला आहेच. काही काळाने आकाशनिंब जागा होईल.

यांना कुणी कसला वसा दिलेला नाही. फक्त यांची अंतःप्रेरणा कशानेही गढूळत नाही. नेहमीच्या ओळखीचा एक गुलमोहोर तोडून बोडका केलेला होता. त्यानेही नवीन पालवी आणि फुलं फुलवलेली हल्लीच दिसली. एकदा एक कार्यक्रम संपल्यावर त्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी होते. खास पुण्याचा हलका पाऊस पडून गेला होता. वर आकांताने फुललेल्या नीलमोहोराचा सडा नुकत्याच निघून गेलेल्या गाड्या उभा असणारा भाग वगळता सर्वत्र होता. विषण्णता मागे सोडून गेलेल्या क्षणांच्या मधल्या जागेत सौंदर्याची पखरण करणारं काही असेल, तर ते नाकारलंच पाहिजे का?

मागे फुलांच्या काही आठवणी लिहिल्या तेव्हा कुणीतरी प्रश्न विचारलाच होता 'हे असलं करायला इतका रिकामा वेळ कसा मिळतो'? त्याचं उत्तर आजच जाणवलं. फुलं पाहण्याची दृष्टी असणार्‍यांना फुलं उचलणं, त्यांचं कौतुक करणं वगैरे 'करावं' लागत नाही. सृजनासाठी लागणारं मार्दव, आणि आविष्काराप्रति अलिप्तता, हे मातीचे गुण एकदा जाणवले की त्यांची ओढ लागते हातांना. फुलांच्या स्पर्शाने माती भेटायला येते... 

आत्ताच्या काळातही फुलं बघायची का, हा असा प्रश्न अपेक्षित नाहीच असं नाही. श्वास किती मोजके शिल्लक आहेत याची धगधगीत जाणीव मागच्या दीड वर्षाने करून दिली आहे. खूप काही हिरावून घेऊन गेलेला हा काळ. पण तापासह अनुताप मागणारे बोरकर नुसते वाचून सोडून द्यायचे? उत्कट जगणं, आणि निर्ममपणे कालचक्र स्वीकारणं सहजपणे करणारी झाडं आणि फुलं पाहून दगड होणं निवडायचं? 

बहाव्याच्या झुंबरमाळा जोवर झुलत राहतील, शिरीषाचे तुरे फुलत राहतील, कदंबाचे गेंद नव्याने येत राहतील, आणि आकाशनिंब धरणीला शेले पांघरत राहील- तोवर माझा अहंकार सुखावणाऱ्या बधिरतेला उच्च ठरविण्याचा अधिकार मला मातीने दिलेला नाही. मातीत मिसळताना मला हे हिशोब मागेल ती, आणि ते कधी होणार आहे याची मला काय कल्पना? तोपर्यंत जगण्याचा करार पाळायला पाहिजे... 

-ऋता


Comments

Popular Posts