दिवे, झाडं, आणि निळाई
शंकर रामाणींबद्दल सर्वसामान्य माहिती ही 'दिवे लागले' पासून सुरू होते, आणि तिथेच संपते. त्यांचं 'पालाण' सोडल्यास मराठीत फार काही सहज उपलब्ध नाही. कवितेची समीक्षा करून त्यांचं काव्य श्रेष्ठ की कसं ते ठरविण्याची माझी पात्रता नाही, पण रामाणींचा इतका कमी उल्लेख व्हावा हे काही पटत नाही. त्यांच्या कवितेतील गोवा वीकएंड सहलीइतका सहज पचवता येत नाही, हेही कारण असेल. मुळात त्यांचं गोव्यावर म्हणून जर काही प्रेम असेल त्याचं विशेष प्रदर्शन आढळत नाही. गोव्यातल्या रोजच्या आयुष्यात सहज दिसणार्या प्रतिमा त्यांच्या कवितेत उतरून आलेल्या दिसतात. त्या प्रतिमा ठोकळेबाज नाहीत. जुन्या रेशीम साडीची घडी उलगडावी, तशी त्यांची कविता हळुवार सोडवावी लागते. तिचा पोत स्पर्शून अनुभवावा लागतो. गोव्यात घर म्हणून असेल, पण मला त्या प्रतिमा भारून टाकतात हे खरं.
याच कारणासाठी मला त्यांच्या कोंकणी कविता वाचायची फार इच्छा होती. त्यांच्या कवितेत भेटणारा सकाळच्या धुक्यातला अस्पष्ट, अस्पर्श गोवा कोंकणीत जास्त उत्कटपणे उमटला असेल असं वाटत होतं. आणि बराच काळ शोधत होते ते रामाणींचं 'निळें निळें ब्रह्म' काल अचानक हाती लागलं. अनेक विशिष्ट, खास त्यांच्याच कवितेत सापडावेत असे शब्द शोधत शोधत, अर्थ लावत ते वाचते आहे. पाणी, दिवे, निळाई, झाडं जिथे तिथे याही कवितांमध्ये भेटतात. काहीतरी गूढ गुपित मांडून ठेवल्यासारखी एकेक कविता समोर उभी राहते. साधं-सरळ वर्णन तर आहे असं वाटत असताना अचानक एक उन्हाची तिरीप यावी तशी नवीनच काही प्रतिमा येते, आणि वेगळाच अर्थ उजळून निघतो.
हे वाचताना सर्वात जास्त जाणवलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या कविता कुठच्यातरी सीमारेषेवर उभ्या असतात. तिन्हीसांजाना, क्षितिजाजवळ, चांदणे आणि अंधार भेटताना अशी त्यांच्या कवितांची आवडती स्थाने. भर दिवसा, ठसठशीत अशा ठिकाणी कविता जवळपास नाहीतच. त्यांच्याच भाषेत 'हुमकळणी वेळ' साधून त्यांची कविता येते. ती स्वतःभोवती गिरक्या घेते, त्यात कवी सुद्धा कधीतरीच नावापुरता येऊन जातो.
अगदीच उदाहरण म्हणून द्यायची म्हणून एक कविता आणि तिचं स्वैर भाषांतर इथे देते आहे. मात्र, पुस्तकात डुंबून कविता अंगात भिनून गेल्यावरची अनुभूती काही मला अशी सहज दाखवता येणार नाही -
एकलो एकसुरो एकसारको
चलत रावतना
वेळ-अवेळाच्यो शिमो हुपिल्ल्या खिणाक
आपशीच
पावलांक उतरां फुटली... तीं
उलोवंक लागलीं...
आनी
धर्तरेच्या कणाकणांत पिकील्ली
पांचवीचार पर्मळाची पसय... तिचो
उर्बेभरीत उजवाड म्हजेखातीर
एक वेगळी वाट रचून... रेखून गेलो...
- त्या वाटेन
आतां हांव चलत रावलां...
एकटा एकसुरा एकसारखा
चालत असताना
वेळ - अवेळाच्या सीमा ओलांडलेल्या
क्षणाला
आपोआप
पावलांना शब्द फुटले... ते
बोलू लागले...
आणि
धरेच्या कणाकणांत पिकलेल्या
हिरव्यागार गंधाचा संधिकाल... तिचा
उबदार उजेड माझ्यासाठी
एक वेगळी वाट रचून... रेखून गेला...
- त्या वाटेने
आता मी चालत राहिलो आहे...
द्वैताच्या सीमेने त्यांना प्रचंड भूल घातलेली आहे. त्यांच्या कवितेतील चांदणेही काळोख विणारे असते. निरनिराळे संधीस्थळ/काळ तर त्यांच्या कवितेत सापडतातच, पण गती आणि स्थितीचीही त्यात बर्याचदा संधी घडून येते. पावलांना कधी नवीन वाट फुटते, कधी झाडांना किलबिलाट, तर कधी दिशांना शब्द फुटतो. रात्रीच्या वेळी थार्यावर नसणारे झाड सावल्या पसरवून संचाराला जाते. मातीखाली दबलेल्या बीने अंकुरावे, किंवा राखेखाली दबलेल्या निखाऱ्याने धुमसावे तशा ह्या सर्व कविता हुंकारत राहतात.
ते धुमसणं हा एकच गुण घेऊन या कवितांमधे माणूस येतो. वेगळी वाट शोधणारा कुणी समाजात कसा वेडा गणला जातो, ही खंत पुन्हा पुन्हा अशा कवितांमध्ये दिसत राहते. प्रतिभा उसळी मारू पाहत असताना व्यवहाराशी जुळवून घेणे भाग पडणे, अशा द्विधा स्थितीमुळेच त्यांची कविता सतत सीमा ओलांडू पाहत असेल का?
रामाणी अजून खूप वाचायचे, पचवायचे आहेत...
-ऋता
खूपच आवडलं आहे हे सगळंच, लिखाण, कविता आणि रामाणी. त्यांच्या कवितांना 'रेशीम साडीची घडी' ही उपमा खूप खूप आवडली, चपखल बसली एकदम. आणि हुमकवणी वेळ😍😍 काय सुंदर शब्द आहे हा. द्वैताची सीमाच हुमकवणी वेळ होऊन येते सगळीकडे, यातून पुन्हा ते दाखवणारा कवी अलिप्त. तुला कवितेच्या आतली कविता शोधायला फार आवडते हे खूप जाणवलं. थँक्यु हे लिहिल्याबद्दल. राग उलगडून दाखवावा कुणी तसं झालं आहे अगदी.
ReplyDelete