कुत्र्याच्या छत्र्या-1

आधी बरीच टाळाटाळ करून झाल्यावर डेडलाइन सांभाळायला जीव तोडून काम करावं,तसा पाऊस पडतोय. कुठेतरी दूरवर गडगडाट वगैरे चालू. मोराला चेव चढलाय. अशा वेळी बागेत आपले या जमिनीचे पूर्वापार मालकीहक्क बजावणारी असंख्य रानटी झाडं-झुडपं पावसाला वेडावून दाखवतायत. पाऊस एवढा की ते इवलुसे नेचे आणि गवताची पाती झोडपून निघतायत. तरीही पुन्हा पुन्हा स्प्रिंगवर असल्यासारखं उभं राहून पावसाला आव्हान देणं चालूच. चिमटीत धरलं तरी चिरडली जाणारी तेरड्याची नाजुक फुलं पावसाचा मारा सहन करत मात्र मिश्कीलपणे उभी आहेत. अंगणात निसरडेपणा खूप म्हणून माडाच्या झावळ्या चालण्यासाठी टाकलेल्या. त्या पाण्यात बुडून काळ्या झाल्यायत. तेवढं काळेपण सोडलं तर सगळीकडे शेवाळी निसरडा हिरवा रंग. ते संपूर्ण शेवाळ पाण्याने थबथबलेलं असूनपण चक्रमसारखा पाऊस त्याच्यावर ओततोच आहे. जगच असं पिसाटल्यासारखं झालेलं; आणि तेवढ्यात मागच्या चुलीमधे कुणीतरी लाकडं सरकवून फुंकर मारतं. आणि सगळा धूर तरंगत तरंगत पुढे अंगणात येतो. आत्तापर्यंत दंगा घालणाऱ्या या सगळ्यांची आंघोळ घालून शेक दिलेल्या बाळांसारखी अवस्था होते.थंडगार पाण्याच्या माऱ्याने शिरशिरणाऱ्या झाडांना उबदार धूर लेऊन वेगळाच रंग येतो. पाऊस हळूहळू माघार घेतो. सगळी हिरवाई आळसावल्यासारखी होते. पावसाळी ओलाव्यावर तृप्तीचा धुरकट तवंग येतो, आणि भर दिवसा सृष्टी त्या उबदार पांघरुणात झोपी जाते.


Comments

Popular Posts