कुत्र्याच्या छत्र्या-2

फुलांचे हार आणि गजरे बनवण्यात एक्स्पर्ट अशा रिवणच्या काकूने बनवलेल्या शंकराच्या फुलांच्या वेणीचा फोटो दादाने पाठवला आणि मन एकदम लहानपणीच्या सुगंधी आणि रंगीबेरंगी वातावरणात गेलं. या सुगंधांना आणि रंगांना नाजुक हातांनी आणि अफाट कल्पनाशक्तीने अजून खुलवणाऱ्या काकूच्या सहवासात माझं बालपण गेलं. आईची हौसपण काही कमी नव्हतीच. पहाटे उठवून ती ओवळं/बकुळी गोळा करायला पाठवायची. अर्धवट अंधारात दंव पडलेल्या रानगवतावर ओवळीच्या फुलांचा पडलेला खच बघणं म्हणजे चांदण्यांनी भरलेल्या आकाशात उभं राहण्यासारखा स्वर्गीय अनुभव असतो. ओवळीच्या जवळ सुरंगी. खोडालाच येणारी ही फुलं मला फारशी आवडत नसली(झाडावरच्या लाल मुंग्यांची म्हणजेच हुंबल्यांची झुंड हे मुख्य कारण), तरी त्यांचा नाजुक मखमली पिवळा रंग आणि उग्र सुगंध आठवणीत घर करून आहे. अशीच आठवणीतली फुलं म्हणजे निळ्या/पांढऱ्याच्या अनेक शेड्समध्ये फुलणारी गोठलां/कोरांटी. याना थेट झुडपातल्या त्यांच्या काटेरी आवरणातून ओढलं, की अलगदपणे ती बाहेर यायची. अजून एक प्रचंड प्रमाणात फुलणारी लाडकी ती शब्दुली/गुलबक्षी. कपड्यांवर असले तर भलतेच भडक वाटतील अशा शेड मधले पिवळा, लाल, गुलाबी, केशरी हे रंग आणि त्यांची कॉम्बिनेशन्स या शब्दुलीवर किती गोड वाटायची. अशीच भरपूर फुलणारी अबोली, हिचा रंग हलका आणि शांत. पण त्या झुडपाजवळ एकदा छतावरून पडलेला दिवड आणि एकदा पहुडलेलं माळुंड यांनी तिथे जायचा उत्साह कमी केला. जाई-जुईचं प्रेम थोडंसं नंतरचं, पण तेवढंच. जाईची किंचित गुलाबी रंगाची एक पाकळी आणि जुईचा नाजुक शुभ्र रंग, तरीही दोघांचा दरवळणारा वास तेवढा संध्याकाळच्या अंधारात जास्त लक्षात रहायचा.

या फुलांचं सौंदर्य कुठे नजरेआड राहू नये म्हणून की काय, पण त्यांना गुंफायच्या आणि सजवायच्या वेगवेगळ्या पद्धती गोव्यात वापरतात. केसांत फुलं माळण्याचा आधीच्या पिढीला सोस आणि त्यांना गुंफायच्या रोजच्या नवीन तऱ्हा बघून हरखायचा मला. हे गुंफायचे धागेही नैसर्गिक असायचे. केळीच्या खोडाचे दोरे काढून वाळवायचे आणि मग किंचित भिजवून त्यात जाई, जुई, अबोली वगैरे फुलांना भरगच्च गुंफायचं. इतर अनेक फुलांच्या दुपेडी धाग्यात वेण्या करायच्या; सुई-दोरा वापरणे अगदीच अनपॉप्युलर होते. इतर सगळं केळीच्या धाग्यात तर ओवळं मात्र माडाच्या झावळीच्या दोऱ्यात. त्याच्या कडक बाजूला फूल घातलं, की सुर्रकन खाली जायचं. शब्दुली, मधुमालती अशा फुलांची हातावरची वेणी. गोठलांच्या उद्या फुलणाऱ्या कळ्या काढून त्यांच्या देठ वळवून वेण्या करायच्या आणि फुलायला बाहेर ठेवायच्या. अजून किती फुलांचं काय काय सांगावं? हा निसर्गसौंदर्याचा मानवी प्रतिभेने साजरा होणारा उत्सव होता. शहरात राहून माझं गाव, माझं गाव करत राहण्यात खरं तर अर्थ नाही, पण इथल्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या फुलांच्या दुनियेत माझ्या आठवणीतली फुलं गुंफायला माझ्याकडे शब्द आणि आठवणींचेच धागे तर आहेत..


Comments

Popular Posts