नेपाळ भेट
काही काळापूर्वी मोमो खायची हुक्की आली, म्हणून एका विक्रेत्याकडे पार्सल होण्याची वाट बघत होते. तेवढ्यात त्याला फोन आला, आणि बर्यापैकी मराठीच्या जातकुळीतली, पण कधी न ऐकलेली भाषा तो बोलू लागला. त्याचा फोन झाल्यावर सवयीने विचारलं की ही भाषा कोणती? तो म्हणाला नेपाळी. भाषा म्हणून ऐकलेली नेपाळीची वैशिष्ट्ये पटापट आठवली, पण काही काळातच त्या प्रदेशात जाऊन भाषाही ऐकणार आहे हे तेव्हा माहीत नव्हतं.
त्यानंतर काही काळातच एक आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स नेपाळला होणार असल्याचं नोटिफिकेशन आलं. त्यासाठी असाच कुठेतरी भटकत असताना सारांश पाठवला, आणि त्यांची मान्यताही आली. त्यानंतर मात्र इतकी निरनिराळ्या प्रकारची गडबड चालू होती, की तिकीट काढेपर्यंत खरोखर तिथे जाईन याची खात्री वाटत नव्हती. जायचा आठवडा आला तरी काहीच प्लॅन करता येईना. शेवटी नेपाळ सीमेजवळ गाव असलेल्या एका मैत्रिणीला गाठलं, आणि तिने सांगितल्याप्रमाणे तयारी करून एकदाची काठमांडूला मार्गस्थ झाले.
अवघा अडीच तासांचा प्रवास. पण त्यातही पहाटे पहाटे दिसलेल्या पर्वतरांगा, आणि त्यातला अप्रतिम सूर्योदय यांनी हिमालयाच्या कुशीत जात असल्याची चुणूक दिली, आणि इतक्या महिन्यांची धावपळ विसरायलाच झाली. काठमांडू विमानतळावर पोचल्या पोचल्या देवनागरी लिपीतल्या पाट्या दिसायला लागल्या. ही लिपी वापरणाऱ्या पाच भाषांपैकी चार तर मला येतातच. त्यामुळे लिपी तीच पण भाषा पटकन समजत नाही, हा गोंधळून टाकणारा नवीन अनुभव होता. (या लिपीत अनुस्वार नाहीत, कचटतपची अनुनासिकं वापरतात ही अजून एक गंमत) एक भारतीय रुपया म्हणजे 1.6 नेपाळी रुपये. भारतीय रुपये बर्यापैकी सर्वत्र चालतात, पण दर मात्र सर्व नेपाळी रुपयांत. त्यामुळे 16 चा पाढा म्हणत, गणितं करत, डोक्यावर येणार्या लाईटच्या वायर्सचं जंजाळ चुकवत, चिंचोळ्या गल्ल्यांमधून एकदाची हॉटेलवर पोचले, आणि नेपाळला असल्याची खरोखर जाणीव झाली.
Covid काळात ऑफलाईन कॉन्फरन्स बंद असल्याने कुणीच भाषाशास्त्रज्ञ भेटेनासे झाले होते. त्याची पूर्ण कसर यावेळी भरून निघाली. तीन दिवस भरगच्च कॉन्फरन्स होती, त्यामुळे तेव्हा काहीच फिरायचं नसल्याने वातावरणाशी जुळवून घ्यायला पुरेपूर वेळ मिळाला. पण या तीन दिवसांत मी तिथल्या कॉलेजच्या स्वयंसेवकांसोबत भरपूर चकाट्या पिटल्या. सर्व बाजूंनी जमीन असणारा छोटा देश असणं, म्हणजे काय त्याची मला कल्पना येऊ शकत नाही. पण त्यांना उच्चशिक्षण, रोजगार, ते मनोरंजन अशा प्रत्येक गोष्टीसाठी शेजारी मोठ्या देशांवर कसं अवलंबून राहावं लागतं, ते कळायला या गप्पा फारच उद्बोधक होत्या. नेपाळी लोकांची एक पिढी अनेक कारणांसाठी हिंदी शिकली. आत्ताची कॉलेजची मुलं YouTube सिनेमे पाहून तमिळ शिकत आहेत. भारतावर असलेलं शिक्षण-रोजगारासाठीचं अवलंबन मात्र आता चीनच्या दिशेने झुकत आहे, याचीही इथेच जाणीव झाली.
नेपाळ एवढासा देश असला, तरी त्यात अनेक प्रकारचे अस्मितांचे प्रवाह दिसतात. हिंदू आणि बौद्ध हे प्रवाह तर काठमांडूमध्येच ठळकपणे दिसून येतात. त्याव्यतिरिक्त पटकन न समजून येणारा असे नेवार आणि अन्य नेपाळी लोक असा भेद सुद्धा तिथे फार खोल आहे. तिथल्या निरनिराळ्या राजघराण्यांच्या उदयास्तासोबत तिथल्या भाषांची स्थिती बदलत गेली. नेवार भाषेचं राजकीय दमन कसं झालं, हे ऐकताना कोंकणी आठवत होती. तिथे असेपर्यंत गावगप्पा मारून जवळपासच्या दुकानदारांशी, हॉटेलच्या स्टाफशी चांगली गट्टी जमली होती. त्यातले एक काका शेवटच्या दिवशी म्हणाले, 'देखो बेटा, जब तक नेवार हैं, तब तक नेपाल हैं'. आपण खरे नेपाळचे लोक, आणि आपल्याच हातात ही संस्कृती जपणे आहे, ही भावना नेवार लोकांच्यात अतिशय तीव्र आहे.
मात्र ह्या जुन्या संघर्षासोबत नवीन संघर्षसुद्धा नेपाळला भेडसावत आहेत. कॉलेजच्या वर्गांना दिलेल्या नावांमध्ये निरनिराळ्या विचारधारांची रेलचेल दिसत होती. राजसत्ता जाऊन लोकशाही आल्याच्या काही वर्षांत ही परिस्थिती कदाचित आली असेल. एरवी धट्ट्याकट्ट्या लोकांच्या या प्रदेशाला आजूबाजूच्या मोठ्या देशांच्या सोबत धावताना धाप लागतेय, हे सततच जाणवत होतं. मी राहत होते तो ठमेल भाग तिथला पर्यटकांचा मध्यवर्ती भाग आहे. तिथे एक रेल्वे बुकिंग काऊंटर सोडता, एकदाही मला भारताशी संबंध दर्शवणारा काहीही फलक दिसला नाही. चीन मात्र सर्वत्र झळकत होता - एअरलाईन्स बुकिंग, चलन बदली, बँक एटीएम, सर्वत्र. मात्र, तिथल्या लोकांना भारताबद्दल आत्मीयता आहे, हे कायम फिरताना लक्षात येत होतं. मी भारतीय आहे हे कळल्यावर 'पण तू तर नेपाळी वाटतेस' हे ऐकायला यायचंच.
बरेच लोक काठमांडूमध्ये फक्त पुढे कुठेतरी हाईक/ट्रेक साठी जाताना वाटेतील एक टप्पा म्हणून राहतात. मी मात्र तिथेच राहणार होते. तिथे उबर चालत नाही, मात्र 'पठाओ' असं एक बांगलादेशी/नेपाळी एॅप चालतं. त्यावरून बाईक किंवा कार मागवता यायची. तिथल्या वास्तव्यात मी त्यांची बाईक, कार तर मागवलीच, पण त्याशिवाय शेवटचे दोन दिवस एकटी असताना साधी बस, सरकारी 'साझा' बस, आणि साधारण कोंबड्या न्यायला वापरतात त्या आकाराची मायक्रोबस, असे सर्व प्रकार वापरले. एकटीने फिरताना मला सार्वजनिक वाहतूक सर्वात सुरक्षित वाटते. इतक्या गर्दीत तिथे ब्रेकचे धक्के खात फिरताना एकदाही, चुकूनही कुणाचाही स्पर्श झाला नाही हे आवर्जून नमूद केलं पाहिजे. या बसमध्ये तिथलं आत्ताचं 'कालो चस्मा' नावाचं व्हायरल गाणं ऐकायला मिळणं, हा एक बोनस होता. त्याआधी माझ्या गाईड सोबत होत्या, त्यांच्यासोबत तंगडतोड तर प्रचंड केली. पहाटे हिमालयात जाऊन सूर्योदय पाहिला, काठमांडू आधीची त्यांची राजधानी, भक्तपूर पाहिली. पशुपतीनाथ, स्वयंभूनाथ स्तूप, बौधस्तूप अशी ठिकाणं पालथी घातली.
एकूणच भरपूर फिरत, तिथला इतिहास ऐकत आम्ही तिथल्या लोकांचं आत्ताचं जीवन समजून घ्यायचा प्रयत्न केला. ठमेल भागातून सर्व मोठे ट्रेक करायला लोक जातात. तिथे त्यामुळे ट्रेकिंग साधनं मोठ्या प्रमाणात विकली जातात आणि तयारही होतात. थंडी प्रचंड, त्यामुळे लोकरी वस्तूसुद्धा मिळतात. आम्हीही एका ठिकाणी लोकरीच्या वस्तूंची खरेदी केली. बाहेर आल्यावर निरनिराळ्या प्रकारचं मीठ विकायला ठेवलं होतं. ते इतकं सुंदर दिसत होतं, की तेही विकत घेतलं. आणि मग परत आल्यावर गूगल वर तो भाग धुंडाळत असताना लक्षात आलं, की हा सर्व भाग प्राचीन भारतीय-तिबेटी व्यापार मार्गावर आहे, आणि तिबेट मधून इथे प्राचीन काळापासून लोकरीच्या वस्तू आणि मीठ विकायला येत असे! प्रवाही भाषेच्या अभ्यासक असणार्या आमच्यासाठी असा जिवंत, जागता इतिहास अनुभवता येणं हा फारच रोचक अनुभव होता.
इथला इतिहास एकूणच वाहता आहे. या असॉन बाजारपेठेत, किंवा इंद्र चौकात फिरताना शतकानुशतकं वापरात असणार्या बाजारपेठेचा कोलाहल अनुभवता येतो. इथे सर्वत्रच जुन्या वास्तूंना भूकंपांनी सारखी हानी पोहोचत असते. काठमांडू मधील दरबार चौक काय, किंवा भक्तपूरची जुनी देवळं काय, अनेक वास्तू डागडुजी चालू असल्याच्या अवस्थेत दिसतात. पण तरीही भक्तपूरमध्ये त्या प्राचीन देवळांत आजही सकाळी सकाळी थाळ्या घेऊन पूजेला निघालेल्या बायका दिसतात आणि अमूर्त संस्कृती मात्र अजूनही तितकीच जिवंत आहे, याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. काठमांडूमध्ये कवटी हातात घेतलेल्या कालभैरवाचं उग्र रूप पाहतो तोवर बौद्ध लोकांनी त्यांच्या प्रथेप्रमाणे भरपूर खाऊ घालून वाढवलेले पारव्यांचे थवे समोरच्या शंकराच्या मूर्तीच्या अंगाखांद्यावर खेळताना दिसतात. माकडं तर पशुपतिनाथाच्या आवारातील हनुमानाच्या डोक्यावर, आणि स्वयंभू स्तूपाच्या आवारातील बौद्ध मूर्तींवर सारख्याच हक्काने ठाण मांडून बसलेली असतात. सारखे होणारे भूकंप, राजकीय अस्थैर्य, स्थलांतर करायला भाग पाडणारी गरीबी, या सगळ्या अस्मानी-सुलतानी संकटांमध्ये या नेपाळी लोकांचं दैनंदिन जीवन जुन्या जगाशी घट्ट नातं राखून आहे. सर्वत्र दिसणार्या पर्वतरांगांचं अविचल रूप, आणि त्यांच्या पायथ्याशी दाटीवाटीने उभी रंगीत चंचल घरं, हे काठमांडू जवळच्या कुठल्याही टेकडीवरून दिसणारं दृश्य नेपाळचा स्वभाव मांडणारं सार्थ दृश्य आहे.
तिबेटच्या बौद्ध धर्मात कालचक्र मंडल क्रिया असते. त्या प्रकारच्या थंग्का चित्रांची एक शाळा आम्ही भक्तपूर मध्ये पाहिली. अतिशय मन लावून, शांतपणे, दगडांचा बारीक भुगा करत करत दिवसेंदिवस खपून एक विशिष्ट चित्र तयार करायचं, आणि मग ते पुसून टाकायचं अशी ही बरीच प्रसिद्ध पद्धत आहे. आयुष्य सुंदर आहे, पण क्षणभंगुर आहे अशी त्यामागची कल्पना. शेवटच्या दिवशी काठमांडूमध्ये पडझड झालेल्या दरबार चौकाजवळ एका उंच जागी बसून खालचा अखंड वाहता जीवनप्रवाह पाहताना तेच आठवलं. हिंदू आणि बौद्ध, दोन्ही तत्वज्ञानांना कवटाळून जगणाऱ्या या हिमालयीन देशात हे सर्व अध्यात्म फार दूर वाटतच नसेल. कदाचित तेच त्याचं आकर्षण आहे.
तशी नेपाळची 'महत्त्वाची' ठिकाणं काहीच पाहता आली नाहीत. एव्हरेस्ट एक-दोन वेळा लोकांनी दूरवर दाखवलं, पण त्यांनी कुठल्याही डोंगराला बोट दाखवलं असतं तरी ते माझ्यासमोर एव्हरेस्ट म्हणून खपून गेलं असतं. परत येताना पोखारा, चितवन फिरून आलेले टूर कंपनीमधून गेलेले लोक भेटले तेव्हा लक्षात आलं की आपण मोठं काही पाहिलंच नाही. पण फक्त काठमांडू आणि आसपासच्या भागात जे अनुभवलं, ते मात्र आत्तापुरतं पुरेसं आहे एवढं नक्की.
-ऋता
Comments
Post a Comment