केपटाऊन डायरीज - भाग 1 (बनी चाव)

दक्षिण आफ्रिका हा टोकाच्या विरोधाभासांचा देश आहे. इथे पर्यटक म्हणून येऊन गेलेले ओळखीचे लोक इथल्या निसर्गाचं, इथल्या आतिथ्यशीलतेचं वर्णन कायम हरखून, भारावून जाऊन करतात. कामानिमित्त मी इथे येऊन राहते, तेव्हा मलाही हे सगळे सुंदर अनुभव सर्वार्थाने येतातच. मात्र त्यासोबतच गुन्हेगारी, गरीबी यांचा शाप मिळालेली, आणि वर्णद्वेषी इतिहासाला उःशाप शोधणारी दक्षिण आफ्रिकाही अपरिहार्यपणे भेटतेच.


भारतीय म्हणून या इतिहासाचा एक वेगळा कंगोरा कायम अभ्यासात, आणि अनुभवाला येत असतो. दक्षिण आफ्रिकेत प्रचंड संख्येने भारतीय वंशाचे लोक आहेत. यांचे मुख्य प्रकार दोन - एक म्हणजे उसाच्या मळ्यांवर करारनामा करून आलेल्या (मुख्यतः भोजपुरी, तामिळ इ.)'गिरमिटिया' मजुरांचे वंशज. आणि दुसरे इथे निरनिराळे व्यवसाय करायला आलेल्या (प्रामुख्याने गुजराती, काही प्रमाणात कोंकणी इ.) अशा प्रवासी भारतीयांचे वंशज. यांच्यात काही प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण झाली असली, तरी हे अनेक प्रांत, जाती, धर्म, भाषा, आणि निरनिराळ्या खाद्यसंस्कृती घेऊन आलेले लोक सव्वाशे ते दीडशे वर्षानंतरही अनेक प्रकारचं वैविध्य टिकवून आहेत. या काळात घडून गेलेल्या वर्णद्वेषाच्या अंधाऱ्या जगातून पार पडूनही कोंकणी मुसलमानांची नारळाच्या रसातली 'सान्नां', सुरती गुजरात्यांचा (इथल्या उच्चारानुसार) 'डोकरा', तामिळ मुरक्कू इ. गोष्टी घरी, आणि बाजारीही टिकून आहेत.


आज मी ज्याबद्दल लिहितेय, तो 'बनी चाव' मात्र खास इथला, इथेच उत्क्रांत झालेला भारतीय पदार्थ. हा खाद्यपदार्थ दक्षिण आफ्रिकेतल्या भारतीय इतिहासाचा एक साक्षीदारच म्हटला पाहिजे. आफ्रिकेतील भाषांवर आयुष्यभर काम केलेले माझे इथले गाईड प्रा. राजेंद मेस्त्री, यांची एक रोचक A Dictionary of South African Indian English आहे. त्यातलं एक संपूर्ण पान त्यांनी या पदार्थासाठी खर्ची घातलं आहे, इतका तो महत्त्वाचा आहे. मी लिहिणार आहे त्यातली बरीचशी माहिती थेट त्यांच्याकडून, किंवा या डिक्शनरीमधून मिळालेली असल्याने तिचा संदर्भ शेवटी देईनच.


तर, इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे ती म्हणजे, 'बनी चाव' किंवा, नुसताच 'बनी' याचा सशाशी काहीही संबंध नाही. ती संज्ञा सुरुवातीच्या काळात तो विकणार्‍या 'बनिया' लोकांवरून आलेली आहे. अखंड ब्रेड लोफ आतून कोरून काढून तो पातळ भाजीने भरायचा, आणि कोरलेला भाग त्यावरून झाकायचा - की बनी चाव तयार. खाताना बाजूबाजूने भाजीत मुरत जाणारा ब्रेड फोडायचा, आणि त्या भाजीत बुडवून खायचा. 


या विशिष्ट जुगाडू रचनेचा संबंध थेट मळ्यात काम करणार्‍या मजुरांच्या आयुष्याशी आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगत हे लोक काबाडकष्ट करायचे. त्यांना डब्याचे सोपस्कार न करता सहज वर्तमानपत्रात गुंडाळून नेता येण्यासारखा पोटभरीचा प्रकार म्हणून याची सुरुवात झाली. ही सुरुवात नेमकी कोणत्या रेस्टॉरंटने केली, हा बहुधा 'रसगुल्ला कोणाचा' या इतकाच ज्वलंत प्रश्न असावा. भारतीयांचा आजही मोठा भरणा असलेल्या डर्बनमध्ये ती झाली, हे मात्र नक्की. सुरुवातीला इथल्या राजम्यासारख्या शुगर बीन्सची भाजी यात मुख्यत्वे भरली जायची. आता चिकन बनी, मटण बनी सहज मिळतात.


इथल्या 'केपटाऊनस्थित डर्बनचे भारतीय' वगैरे भूगोलाला चक्कर आणेल अशा नावांच्या ग्रुप्सवर 'डर्बन सारखा अस्सल बनी कुठे मिळेल' अशा चर्चा रंगतात, आणि 'कुठेच नाही' इथे संपतात. माझ्या डर्बन वास्तव्यात काही बनी खाणं झालं नव्हतं. त्यामुळे केप टाऊनात डर्बनच्या लोकांनी उघडलेल्या रेस्टॉरंटात तो खायची हौस भागवावी लागली. मुंबैकर ज्या अमाप उत्साहाने पुण्यात चाट खायला जातो, त्याच उत्साहाने डर्बनकर केप टाऊनात बनी खायला जातो. प्लेट मध्ये मांडून वगैरे आलेला बनी पाहून लगेच 'तो खरं तर वर्तमानपत्रात दिला पाहिजे, हे फॅन्सी प्रकार झाले' असा प्रोफेसरांचा शेरा आलाच. पण चवीला तो थोडाफार तरी डर्बनच्या दर्जाचा असेल (कारण मालक तिथला!) असंही लगेचच ते म्हणाले, आणि एकदाची बनी चाखून मी सुखी झाले. 


क्वार्टर आणि हाफ लोफ अशा प्रमाणात बनी मिळतो. त्यासोबत येथील मलायी प्रभाव असणारा 'सांबाल' असा कोशिंबीर-सदृश प्रकार मिळतो. खाताना एकवेळ वर्तमानपत्राच्या कागदाऐवजी प्लेट चालेल, पण काटे-चमचे मात्र पूर्णतः निषिद्ध. बनी हा भारतीय पद्धतीने हातानेच खायचा, डोसे काट्याने खाणार्‍या लोकांसारखा नाही. 


बनी हे कष्टाळू लोकांचं खाणं का असावं, हे त्यातला अर्ध-चतकोर भाग खाऊन दिवसभरासाठी गार झालेल्या माझ्यातल्या पांढरपेशीला लगेच जाणवलं. इथल्या नवीन भारतीय वंशाच्या पिढीला हा प्रकार कितपत आवडतो याची कल्पना नाही. दक्षिण आफ्रिकेतील मुख्य प्रवाहात मिसळायचं अमाप प्रेशर, शहरी, डायट कॉन्शस जीवनशैली यांत दबलेल्या त्यांना हा मसालेदार प्रकार आवडत नसेलही. पण माझी शेवाळलेली जीभ बनी चाव खाऊन तृप्त झाली हे मात्र खरं.


-ऋता


डिक्शनरीचा संदर्भ :

https://doi.org/10.58331/UCTPRESS.37

Comments

Popular Posts