केपटाऊन डायरीज - भाग 2 (अग्निसुमनांचा प्रदेश)

इथल्या केपटाऊनमधल्या दिवसभरात चार ऋतू दाखवणार्‍या हवामानात आणि सकस पोत नसलेल्या मातीत झाडी-झुडपांचाच प्रादुर्भाव जास्त. रुक्ष, कळाहीन, मख्ख वाटत असली, तरी थंडी-पाऊस सुरू झाला तसे त्यातल्या चिमक्या कांड्यांनाही फुलांचे तुरे फुटलेले दिसले. निळ्या-जांभळ्या ते गुलाबी छटांच्या नाजुक पाकळ्या, नाहीतर मातकट- काळसर शेंडे, नाहीतर एकदम आग पेटावी असे केशरी-तांबडे झळझळीत फुलांचे रंग मॉल आणि रस्त्यांच्या गर्दीतही दिसू लागले. हत्तीच्या सोंडेवर फुलपाखरं बसावीत अशी सुरेख दृश्यं. खुरट्या झाडांचं मला आधी कधी विशेष आकर्षण वाटलं नव्हतं. पण यांच्या राठ नजाकतीच्या प्रकृतीला डोळे सरावल्यावर पदोपदी त्यांचं सौंदर्य दिसायला लागलं. 

केप टाऊन शहरात इथल्या इतिहासामुळे अनेक संस्कृतींची सरमिसळ जशी झालेली दिसते, तशीच एकाच दिवसात अनेक प्रकारच्या हवामानाची सरमिसळ अनुभवता येते. कमीत कमी व्याप्तीत जास्तीत जास्त वैविध्य, हा एकमेव या शहराचा स्थायीभाव म्हणता येईल. पर्वतरांगा, दोन महासागर, थोडंसं दूर गेलं की वाळवंट, असा सगळं एका जागी मिळवायला हपापलेला भाग आहे हा. या अट्टाहासाचं प्रतिबिंब केप भागातल्या अद्भुत वनस्पतिवैविध्यातही आहे. उदाहरणार्थ, 'फेइन्बॉस' झाडोरा फक्त केप विभागात आढळतो. यात हजारो प्रजाती येतात. युनेस्कोच्या वेबसाईटनुसार संपूर्ण आफ्रिका खंडातील वीस टक्के वनस्पतिप्रकार फक्त केप भागात आहेत.

बॉटनीशी अजिबातच संबंध नसल्याने मला इथल्या या चित्रविचित्र विश्वाची शास्त्रीय माहिती इंटरनेटवर सहज सापडते तेवढीच आहे. मात्र, या शहरात डोळे उघडे असले तरी खूप काही सहज सापडून जातं. इथले माझ्या संपर्कात असणारे लोक काही विशेष झाडापानांच्या जगातले नाहीत, त्यामुळे माझी मजल या सर्वांचे जमतील तसे फोटो काढून त्यांची गूगल लेन्सवरून माहिती शोधणे इतकीच असते. पण त्यातही जे सापडतं ते स्तिमित करणारं आहे. 

उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेचं राष्ट्रीय फूल प्रोटिया. याचेच असंख्य प्रकार आहेत. त्याचे नातेवाईक फक्त दक्षिण गोलार्धात सापडतात. त्यावरून असं बहुतांशी मान्य अनुमान आहे, की गोंडवानाचे तुकडे होण्याआधीपासून ही फुलं अस्तित्वात आहेत. लाखो वर्षं मुळं पकडून आहेत ही फुलं! 



आणि हे जगणं सोपं आहे का? इथल्या फेइन्बॉसला वंशसातत्य राखायला गरजेची असते ती आग! असं म्हणतात की पूर्ण वाढ झालेल्या फेइन्बॉसला जळल्याशिवाय पुनर्निर्मिती करता येत नाही. त्यांच्या आयुष्यात पाच ते तीस वर्षांपर्यंत एकदातरी ही आग पसरावी लागते. त्यानंतरच पुढची पिढी जन्माला येते. आणि तीही अतिशय स्थानबद्ध. इतकी, की शेकडो फुलं फक्त पर्वताच्या विशिष्ट भागात, विशिष्ट ठिकाणीच सापडतात. किती काळापासून आग पीत ही फुलं जगत आहेत, माणसांच्या इतिहासाच्या कितीतरी आधीपासून. 


केप टाऊनला दक्षिण आफ्रिकेतलं युरोपियन शहर म्हटलं जातं, इतकं हे शहर अन्य आफ्रिकेशी फटकून असतं. पण हा झाडोरा मात्र आपलं या स्थानाशी असलेलं प्राचीन नातं टिकवून आहे. जुनं शरीर त्यागून नवीन जन्म घेणं, हे तत्त्व माझ्या भारतीय मनाला नवीन नाही. पण त्या तत्त्वाची ही मूर्त उदाहरणं माझ्या अनिश्चिततेला घाबरणाऱ्या मनाला काळाच्या अनंततेची शाश्वती देतात. पावसाच्या चक्रासोबत फिरणार्‍या जगातून इथे आलेली मी हे आगीच्या चक्राशी बांधलेलं जग हळूहळू पाहतेय. लाखो वर्षांच्या जगण्याच्या असोशीचे पुरावे आहेत ते, त्यांचं कौतुक करायला नको? 


-ऋता

Comments

Popular Posts