दश्त-ए-तनहाई में - तृप्ती आणि हुरहूर

दुराव्याच्या दु:खाला सौंदर्याची किनार देण्याची ताकद उर्दू भाषेत जबरदस्तच आहे. दु:ख बुडवून ठेवलेल्या खोल डोहाला न डुचमळता हळूच स्पर्श करावा, आणि विरत जाणार्‍या तरंगांना नि:शब्दपणे पाहत रहावं, असं काहीसं काव्य या उर्दू कवींचं. वार्‍यावरून पीस उडत यावं, तसं माझ्यापर्यंत आलेलं दश्त-ए-तनहाई, हे फैझ अहमद फैझचे शब्द आणि इकबाल बानोच्या आवाजातील गाणं याच जातकुळीतलं.
दश्त-ए-तनहाई में, ऐ जान-ए-जहां लरझां हैं
तेरी आवाज के साये, तेरे होटों के सराब..
या दोन ओळींत ते एकटेपण, ती वेढून घेणारी आवाजाच्या सावल्यांची हुरहूर आणि आणि ओठांची मृगजळागत खरी वाटणारी स्मृती; इथपासून सुरू होऊन सगळ्या दर्दसकट आत आत घुसणारं हे गाणं. याच्या पूर्ण काव्यपंक्ती इथे पहायला मिळतील.
http://maraahmed.com/wp/2009/11/24/dasht-e-tanhai-by-faiz-ahmed-faiz-eng...
गाणं इथे ऐकता येईल. ( शांत रात्री कानात हेडफोन्स घालून ऐकल्यास उत्तम)
https://www.youtube.com/watch?v=X90RZxCyuJY
याचा थोडक्यात अर्थ सांगणे, हे लखनवी चिकनची गोधडी करायला घेण्याइतकं अरसिक आणि रुक्ष वाटेल. पण तरी तो सांगितल्याशिवाय त्यातल्या मनात रुंजी घालणार्‍या उपमा कशा बरं पोहोचवता येतील? म्हणून ही पुढची ठिगळं.
एकटेपणाच्या वाळवंटात,
जिवलगा,
अशी थरथर,
तुझ्या आवाजाच्या सावल्यांची,
आणि ओठांच्या मृगजळाची..
एकटेपणाच्या वाळवंटात,
खाक झालेली अंतरे,
त्या राखेत
बहरते,
तुझी सोबत,
जाई अन् गुलाबांची..
कुठेशी जवळच,
तुझ्या श्वासांची आच,
जळू लागते
तिच्याच गंधात,
तेवत राहते..
दूर अस्तंतीजवळ,
दवांत चमकते,
थेंब थेंब,
तुझी नजर..
कुरवाळते,
काळजाची
रेष रेष
तुझी याद..

निरोपाची पहाट,
फुटू लागली तरी,
असं वाटतंय,
की दुरावा मावळतोय,
आणि मीलनाची रात्र,
आलीच आहे..
गोधडी झाली, आता गोधडीत गुरफटल्याचं सुख मला पोहोचवता येईल.
त्या पहिल्या 'लरझां' पासून आत उतरत गेलं हे गाणं व त्यातील शब्द. ज्या नजाकतीने हे शब्द येतात, हुरहूर जिवंत करतात, त्याला तोड नाही. पण ही हुरहूर वियोगाची असली, तरी अपूर्णतेची नाही. प्रेम पूर्ण आहे. प्रेयसाच्या श्वासांची ऊब जवळच आहे, मधल्या जळून, करपून गेलेल्या अंतरांमध्येही जाई आणि गुलाब फुललेले आहेत, आणि क्षितिजावरील दंवातसुद्धा जिवलगाची नजर चमकताना दिसत आहे. आवाजांच्या सावल्या, ओठांचे मृगजळ, हे असे आभास असले तरी त्याची खंत नाहीये. प्रेमाच्या कायमच्या सहवासाची पूर्ती करण्याचा हट्ट नाही दिसत आहे, प्रेमातून आलेल्या तृप्तीचा अनुभव दिसतो आहे. ओढ आहे, पण अट्टाहास नाही. विरहाची पहाट आली, तरी मीलनाची रात्रच आल्यासारखं वाटणार्‍या या प्रेयसीच्या स्वप्नांनी वास्तवावर मात केलेली आहे, यातच सगळं आलं..

Comments

Popular Posts