विश्वास



पावसामुळे स्वच्छ झालेली झाडे चकाकत होती. खिडकीतून बाहेर दिसणार्‍या कण्हेरीच्या झाडावर तो पक्षी मगाचपासून पंख जोरजोरात फडफडवत भिरभिरत होता. त्या इवल्याश्या जिवाची चाललेली धडपड बघून हसूच आवरत नव्हतं.


हळूहळू तो पक्षी सतत दिसू लागला. आणि असाच एकदा मला शोध लागला की घरामागेच वासे घालण्यासाठी केलेल्या छिद्रात त्याने संसार थाटला होता.


मग त्या दोघांची लगबग फारच वाढू लागली. मी म्हणणार्‍या पावसाची पर्वा न करता उपद्व्याप चालले होते यांचे. घरटं तरी कसलं, अस्ताव्यस्त, गबाळं नुसतं. पण जागा मात्र कल्पक निवडली होती. पावसापासून आणि कावळ्या-मांजरांपासून अगदी सहज संरक्षण मिळत होतं.


दोघांची घरट्यात येण्याची पद्धत मात्र अगदी खानदानी. एकदम घरात शिरायचं नाही. आधी चिकूच्या झाडाच्या ठरलेल्या फांदीवर बसून इकडे-तिकडे नीट बघायचं. मग जळणाच्या लाकडावर येऊन बसायचं.(हे लाकूड जागेवरुन हलवायचं नाही असा अलिखित नियम ठरून गेला होता आमचा) आणि मग घरट्यात. एका वेळी एकच बसू शकेल एवढंसं ते घरटं. भातुकलीचा खेळ वाटावा अशी सगळी गंमत.


आणि एके दिवशी सरळ पिल्लंच दिसली तिथे. ४ पिल्लं चिकटून बसलेली एकमेकांना. हरखून गेले मी अगदी. ती करडी पिल्लं त्यांच्या आई-बाबांसारखी निळी-पिवळी सुरेख होणार आणि ती आपल्या घरात वाढणार याचा खूपच आनंद झाला होता.


मग तर त्यांची गडबड आणि सावधानता खूपच वाढली. आतापर्यंत त्या दोघांनी आमचं घरामागे कपडे, भांडी वगैरेसाठी येणं खपवून घेतलं होतं. आता त्यांना आमची फारच अडचण वाटू लागली. मी मागे आले, की माझं काम आटपेपर्यंत त्या वेळी घरट्याचं रक्षण करणारा जबाबदार पालक, त्या लाकडावर बसून एक डोळा वटारून जीव खाऊन ओरडायचा माझ्यावर. एखाद्या छोट्याने त्याच्या पत्त्यांच्या बंगल्याच्या जवळ येणार्‍या मोठ्याच्या अंगावर तक्रारवजा ओरडावे तसा.. आणि तरी त्या छोट्याला जशी खात्री असते की ती मोठी व्यक्ती तो बंगला तोडणार नाही, तशीच काहीशी त्या पक्ष्याची खात्री होती. त्यांच्या संसारात एका मर्यादेत सामावून घेतलं होतं त्यांनी माणसांना.


मला मात्र त्या पिल्लांना बघायची खूप उत्सुकता होती. जवळ न जाण्याचा शक्य तितका प्रयत्न करत होते मी. पण मागील दारी फेर्‍या आपसूकच वाढल्या होत्या.


आणि एक दिवस पावसात भिजून आलेला त्यांच्यातला एक घरट्यात बसलेला दिसला. पिल्लं आणि तो इतके गोड दिसत होते! मला राहवलंच नाही. पटकन कपडे धुण्याच्या उंचवट्यावर उभं राहून मी त्यांना अगदी टक लावून निरखू लागले. तो भिजलेला पक्षीही माझ्या कडे असहायपणे बघत होता. त्याला किती भीती वाटत असेल हे माझ्या डोक्यातपण आलं नाही.


आणि तेवढ्यात दुसरा पक्षी तिथे हजर झाला. मला बघून इतका चिडला की सगळीकडे उडत चिवचिवाट करत अगदी थैमान घातलं त्याने. मी लगेच उतरुन घरात येऊन दार बंद केल्यावरही त्याचा आवाज ऐकू येत होता, खराखुरा चिडलेला वाटला मला तो तेव्हा. मी निसर्गाची मर्यादा तोडून मानवीपणे वागले होते; ढवळाढवळ केली होती त्यांच्या छोट्या विश्वात. त्या चिमुकल्यांच्या नैसर्गिक जाणीवांच्या कक्षेच्या कितीतरी बाहेर होतं माझं वागणं.


आणि दुसर्‍या दिवसापासून पिल्लांसकट पक्षी नाहीसे झाले. दोन आठवडे होऊन गेले. मला ते दोघेही परत कुठेच दिसले नाहीत. एवढ्या पावसात त्यांनी पिलांना कुठे आणी कसं हलवलं माहीत नाही.


ते घरटं मात्र अजूनही आहे. मला तिकडे बघितलं तरी वाईट वाटतं, एक निरागस विश्वास तोडल्याचं..

Comments

  1. ???? ते पक्षी गेले??? बाप रे... :( :'(

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts