रात्र-कोजागरीच्या निमित्ताने
कोजागरीच्या रात्री जागायचं लहानपणी खूप अप्रूप होतं. 'को जागर्ति' म्हणत देवी आली आणि मी झोपलेली असले तर कसं चालेल, असा माझ्या दृष्टीने बिनतोड प्रश्न बाबांसमोर केलेला आठवतो. 'मी खात्री पटवून देईन तिची तू झोपलेली असलीस तरी जागीच आहेस याची' हे तेवढंच बिनतोड उत्तर पेंगुळलेल्या डोळ्यांनी ऐकताना खरं वाटणारच! पुढे वर्षातून एकदा जागवायची रात्र रोजचीच होऊन गेली, तेव्हा रात्रीचं खरंखुरं रूप कळायला लागलं..
घरी असले, की रात्रीत निरनिराळे आवाज पावसाळ्यात येतातच, पण पावसाळा संपला की रातकिडे किरकिर करू लागतात. कित्येकदा घरच्या फोनवर रातकिड्यांचा आवाज ऐकू येतो आणि खूप शांत वाटतं. तेच इथे पुण्यात दिवसभर इतके आवाज, की रात्रीच्या शांततेत त्या आवाजांचे तरंग उमटत राहतात. तरीही, सगळे झोपी गेल्यावर कॉफी घेऊन खिडकीत बसून वाचणे हा आनंद कधी ना कधी मिळतोच. तेवढ्यासाठी ३-४ वाजवण्यात मला कधीच फारसं वाईट वाटलेलं नाही.
एकदा रात्री बसचा नेहमीचा कंटाळवाणा प्रवास करताना गाडी घाटाला लागली, आणि घाटात खोल होत जाणारी रात्र एकदम समोर आली. अत्यंत निरभ्र आकाशात दिसणारे चंद्र-तारे, आणि निश्चल झाडांमधून भिनत जाणारी रात्र पाहून अंगावर एकदम शहारा आला होता. .
गोवा एक्प्रेस मधून दिवसा दिसणारा दूधसागर बघायला नुसती झुंबड उडते. हा रात्री कसा दिसतो ते पाहण्यासाठी मुद्दाम ३ वाजेपासून उठून खिडकीला डोळे लावून एकदा बसले होते. आणि तो खरोखर दिसलासुद्धा.. ती रात्र आणि तो दूधसागर यांना जणू काही एकमेकांचा कैफ चढला होता. तिची शांत तंद्री भंग करण्याचा चंग बांधून त्याचं फेसाळतं नृत्य चालू होतं. आणि त्याचे हे प्रयत्न ओळखूनच जणू काही ती त्याच्या भोवती अजून गडद होत चालली होती. असलं अद्भुत माझ्या मानवी मर्यादांना झेपणारं नव्हतं, पण कायम मनावर कोरलं मात्र गेलं आहे.
राजापूरला मामाच्या घरी खळ्यात बाजेवर बसून ऐकलेल्या भुतांच्या गोष्टींच्या रात्री एकातरी भुताच्या भासाशिवाय पूर्ण झालेल्या आठवत नाहीत. कवठीचाफ्याच्या झाडावर बसून जुन्या लाकडी गजांमधून भूत हात आत घालणार याची तेव्हा काय भीती! शंकरेश्वराच्या मंदिराजवळ वडे तळणारी आणि चाफ्याच्या झाडावर 'ज्योत से ज्योत' गाणं गाणारी भुतं तेव्हा कशाला, आजही तसल्या मिट्ट रात्री खरीच वाटतात.
एकदा एका फील्डवर्कमधे किंचित उंच ठिकाणी असलेल्या एका गावात रात्र झाली..पांघरुण घातल्यासारखं अंधाराने वेढून घेतलं. आणि आकाशातली नक्षी इतकी काही स्वच्छ दिसू लागली, की अजून थोडं चढून गेलं तर लागेलच हाताला मृग नक्षत्र.. आणि केप टाऊनला फील्डवर्कला येताना एका खगोलप्रेमी मैत्रिणीने वेगळाच सल्ला दिला. एखाद्या रात्री आकाश बघ. तिथे वेगळं दिसेल आपल्यापेक्षा. त्यामुळे लक्षात ठेऊन तिथला विचित्र पाऊस नसताना बघितलं आणि बघतच राहिले. दुबई वरून रात्री निघताना तिथल्या लखलखत्या झगमगाटाने जाम परकं वाटलं होतं.आणि इथे रात्री बाहेर पडायला मला सक्त मनाई होती. पण आवारातून का होईना, शांत दिसणाऱ्या रात्रीच्या आकाशाने आश्वस्त केलं. आणि परत येताना ढगांच्या वरून पुन्हा भेटलेले ते चंद्र-तारे.. गोग्गोड काल्पनिक काव्यमय जगात जगण्याचा सोस अगदीच वाईट नाही असं वाटून गेलं तेव्हा..
रात्र रात्र जागण्याबद्दल माझी काळजी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मला एकदातरी त्याबद्दल ऐकवलं असेल..पण अज्ञानाच्या सुखात अलगद झुलवताना अज्ञाताची ओढ मात्र जिवंत ठेवणारी रात्र कोजागिरीची असो का अमावस्येची, जागवण्यात गंमत आहे खरी..

Comments
Post a Comment