फुलांचं पुणं

इतकी वर्षं पुण्यात राहूनही मनाने गोव्यातून बाहेर पडलेच नाही, असं मला नेहमी वाटायचं. पण आज बुचाची फुलं सापडल्यावर वाटलं, की हे काही तितकंसं खरं नाही. गोव्याच्या पुष्पसंस्कृतीत रुजून वाढलेल्या मला पुण्यातल्या रस्तोरस्ती भेटणाऱ्या फुलांनी कधीच इथे आणलं आहे. बाहेरून इथे आल्यावर हमखास कधी ना कधी जाणवणाऱ्या उपरेपणाच्या भावनेला कायम अलगद बाजूला करत आपलेपणाच्या गंधाने या फुलांनी वेढून घेतलं. काही वास्तूंसोबत, काही रस्त्यांसोबत विशिष्ट रंग-गंध जोडून दिले. त्या फुलांची ही कृतज्ञतापूर्वक नोंद.

यात निर्विवादपणे पहिल्या स्थानावर येतात बुचाची/ आकाशनिंबाची फुलं. बहुतेकांप्रमाणे मलाही प्राथमिक शाळेत भेटलेलं हे झाड इतक्या प्रचंड प्रमाणावर फुलतं, हे माहीत नव्हतं. फर्ग्युसनच्या गर्ल्स हॉस्टेलच्या बंदिस्त वातावरणात मुक्त फुलणाऱ्या आकाशाला भिडलेल्या झाडांची रांग कित्येकदा उधळून फुललेली पाहणं मला अप्रूपाचं होतं. वर्डस्वर्थची Daffodils शिकताना समोर हजारोंच्या संख्येत पडलेला सडा पाहणं, ही एक अनुभूतीच. फर्ग्युसनमध्ये या झाडाला landmark धरून फिरायचे मी. एक मोठं झाड मध्ये उन्मळून पडलं, पण त्याच्या समोर फिजिक्स डिपार्टमेंट, मागे केमिस्ट्री, पलीकडे मेन बिल्डिंग, अलीकडे चहाला जायचा रस्ता अशी अॅंफीमध्ये शिकणार्‍या मुलीला त्या भागाची ओळख. पुढे डेक्कन कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रूमच्या बाल्कनीत थेट फुललेलं झाडच दिसायचं. नंतरही माझ्या राहत्या रुक्ष जागेवरून कॉलेजला यायच्या तितक्याच रुक्ष रस्त्यावर ठामपणे फुलणारं झाड हे एक, आणि दुसरा उन्हाळ्यातला गुलमोहोर.

गुलमोहोर या रस्त्यावर फुललेला जितका आठवतो, तितका दुसरा कुठचा पक्का स्मृतीत नाही. उन्हाळा हा प्रकार अति असह्य असल्यामुळे असेल कदाचित, पण तेव्हा भरभरून फुलून आकांताने चांगला दिसू पाहणारा गुलमोहोर मला मात्र आवडला तो पुण्याच्या भुरभुर पावसात. किसून शिवरलेल्या पावसातलं त्याचं नखशिखांत शहारलेलं रूप पुण्यातच दिसायचं. गोव्यात पावसाने झोडपलेला, गारठलेला गुलमोहोर इथे पावसात भलताच खुलून येतो.

जुन्या ओळखीच्या मायेने जवळ घेणारी फुलं म्हणजे FC रोडवरची सुरंगी, आणि खुन्या मुरलीधरामागची बकुळ. ओंजळींनी गोळा करावी इतकी नसली, तरी ही बकुळीची फुलं (माझ्या भाषेत वोवळां) आपलं अस्तित्व पुण्यात टिकवून आहेत. होमसिक होण्याच्या काळात टिमविच्या क्लासला जाताना जरा लवकर जाऊन मुरलीधराच्या मागे प्रदक्षिणामार्गावर जरा रेंगाळणं हा माझा छंद होता. कोंकणात आणि गोव्यातसुद्धा तशी कमी दिसणारी सुरंग तिथे लाल हुंबल्यांच्या फौजेशिवाय सापडत नाही. पण भर गुडलक चौकात कुठे ते पोचायला... थेट खोडाला लगडलेली फुलं त्या लाल झुंबराशिवाय कदाचित लक्ष  वेधून घेत नसतील, पण दरवेळी मान वर करून ते झाड पाहिल्याशिवाय पुढे पाऊल पडत नाही.


नव्याने पुण्यात भेटलेली फुलं मात्र अजून विशेष आहेत. टिमवित संस्कृत शिकत असताना शिरीष फुलावर चर्चा झाली, आणि फर्ग्युसन हॉस्टेलच्या आवारात हे फूल तत्परतेने भेटायला आल्यासारखं दुसर्‍याच दिवशी सापडलं. डेक्कनच्या Archaeology विभागाच्या गच्चीतून शिरीष जवळून फुललेलाही दिसला. संस्कृत साहित्याशी आता माझा काहीच संबंध नसला, तरी दरवर्षी हे फूल त्याची आठवण घेऊन येतं.


आणि तसाच कृष्णभक्तीचा गंध घेऊन येणारा कदंब. चुकार माहिती होता. पण गर्द हिरव्या पानांमध्ये रांगेत फुलून आलेला, दुरून दिसायला थोडा रुक्ष, पण प्रत्यक्षात अतिशय मृदू असा हा कदंब हल्लीच जवळून पाहिला. मी त्याची जाहिरात इतकी जोरदार केली, की माझ्या एका झाडांच्या भानगडीत फार न पडणार्‍या मित्रानेही एक राधाकृष्णाचा फोटो पाठवून विचारलं- यात मागे आहे तोच तुझा कदंब ना? अशा रीतीने हल्लीच भेटलेला कदंब आता माझा झाला आहे.


पण इथल्या नवीन ओळखींमध्ये खूप फुलून खूप जागा व्यापणारा यशस्वी कलाकार मात्र बहावाच. फर्ग्युसनच्या लायब्ररीबाहेर याची पहिली ओळख झाली. हा गोव्यात असता, तर त्याला 'सीतेची वेणी' वगैरे काहीतरी काव्यात्मक नाव मिळालं असतं असं वाटतं. पण इथल्या रस्त्यांवर तो जितका साजरा दिसतो, तितका अजून कुठेच दिसू शकणार नाही, असंही वाटतं. उन्हाळ्याला काही क्षण विसरू लावायचं काम गुलमोहोरापेक्षा बहाव्याला बरं साधतं. किती रस्त्यांवर तो भेटत राहतो, हे मोजणं मी आता सोडून दिलं आहे. पण उन्हाळ्यात रात्री पूर्ण फुलून खाली सडा घातलेल्या बहाव्याच्या रस्त्याइतकं रोमँटिक दुसरं काही नसेल, हे नक्की.


असं काही रोमँटिक वगैरे न वाटू देणारा माझा स्टडी पार्टनर म्हणता येईल, असा देवचाफा. डेक्कनच्या स्टडीरूमच्या दोन्ही बाजूंनी दोन रंगांचे देवचाफे आहेत. डेटामध्ये अडकल्यावर कितीतरी वेळ शून्यात बघत असताना लाल देवचाफा शहाण्यासारखा निश्चलपणे उभा असतो. इतका शहाणा मनुष्यप्राणी होणे नाही. त्याचा एकूणच सौम्य वास आणि प्रकृती त्या डेक्कन कॉलेजच्या वास्तूच्या शेजारी फारच शोभून दिसते.


हे लिखाण अंमळ लांबलेलं आहे, पण पुण्यात भेटलेल्या फुलांचा विचार करता अजून कितीतरी समोर येत राहतात. हे शहर इथे येणार्‍यांना खूप काही देतं. मला जे मिळालं, त्यात या अबोल फुलांना विशेष स्थान आहे, आणि कायमच राहील हे निश्चित.


Comments

Popular Posts