कृष्णाची फुलं

आषाढाचा आक्रमक पाऊस आला, की त्याच्या आव्हानाने चेकाळून जाऊन प्राजक्त फुलू लागतो. एवढ्याश्या फुलाचं कितीही कौतुक केलं तरी संपत नाही, इतके अर्थाचे पदर त्याच्या नाजूक पाकळ्यांना लाभले आहेत. क्षणभर अतिपरिचय झालेलं हे फूल विसरून त्याच्याकडे नव्याने बघितलं, तर इतक्या खडबडीत खोडाच्या आणि खरखरीत पानांच्या वृक्षाला इतकी विशेषणांच्या पलीकडची मऊ पाकळ्यांची फुलं लागतात, हे खरंही वाटेनासं होतं. फुलायचं ते इतक्या आकांताने, की पावसाच्या वरताण झालं पाहिजे. आवाज न करता अलगद निसटून पडणारं हे फूल निव्वळ या त्याच्या संख्येने तुम्हाला त्याची दखल घ्यायला भाग पाडतं. प्राजक्त अव्हेरून पुढे जाणारा माणूस आयुष्यात पावसात नक्कीच कधीही भिजलेला नसणार.


त्याच्या फुलण्याची सवय होईतो पानांच्या आडून डोकावू लागणारं कृष्णकमळ दिसू लागतं. महाभारताचं युद्ध दिसतं म्हणतात यात. त्या पाकळ्या नक्की शंभर आहेत ना, हे कितीदा मोजून (आणि चुकवून) झालेलं आहे. याचा सुवास एक शब्दांत पकडता न येणारा. माणसाच्या नजरेपासून लपून बसणारं हे लाजरं फूल पावसाला मात्र शेकडो हातांनी आवताण देत बसतं. पाऊस पडून गेल्यानंतरचं कृष्णकमळ पहा, काहीतरी जिंकून घेतल्यासारखं चमकत असतं. हे फूल तर माझ्या माहितीप्रमाणे मूळ भारतीयही नाही, आणि तरीही बेमालूमपणे थेट कृष्णाचं नाव धारण करणारं.



आणि तेवढ्यात भल्याथोरल्या वृक्षावर रौद्र पावसाला झेलायची तयारी करत असतात कदंबाचे गोजिरे गेंद. कालिदासाने वर्षापुष्प असंच म्हटलं आहे म्हणे याला मेघदूतात. पावसाचे थेंब एवढ्या मोठ्या झाडावर, एवढ्या मोठ्या पानाआड दिसणार कसे, म्हणून मिरवता येतील असे स्वतःचे पाऊसथेंब घडवून घेतल्यासारखी या झाडाची ही करामत. त्या वृक्षालाही गवताच्या पात्याच्या डौलाची ईर्ष्या वाटत असेलच की, म्हणून तर तो जमेल तितका मृदू भाव या फुलांत ओतून देतो. दिसायला फसवं मजबूत वाटणारं हे फूल इतकं कोमल असतं, की हाताळल्यामुळे कोमेजून जाईल की काय म्हणूनच इतक्या उंचावर फुलत असेल. याच्याही पाकळ्या अशाच बाहेरच्या दिशेने शेकडोंच्या संख्येत नाजूकपणा रोखून धरलेल्यासारख्या.


या तिन्ही फुलांचा पावसाशी चालू असलेला संवाद इतका उघड, खुलेआम असतो, की आपल्यालासुद्धा ऐकू यावा. त्यांचं कृष्णाशी कल्पिलेलं नातं आपसूकच समजून जातं. यमुना बरसवणारे कृष्णमेघ आले, की यांनी बहरावं हे काय उगाच घडतं का? कुठच्यातरी युगांची ही आपणच बांधून ठेवलेली अतूट नाती त्यांनीही मान्य केलेली आहेत. या तिघांमध्येही एक समृद्ध विपुलता आहे, सर्व काही सामावून घेणार्‍या कृष्णाइतकीच. पाऊस आल्यावर परिपूर्ण वाटतं, ते भारतीय म्हणून जन्माला येताना मनात कोरून ठेवलेल्या या पूर्णपुरुषाच्या पूर्वस्मृतींनी असेल का? या तिघांना कधी सांगावंसं वाटलं तर उत्तर मिळून जाईल कदाचित...


-ऋता

Comments

Popular Posts