पुस्तक परिचय: Language Wars and Linguistic Politics by Louis-Jean Calvet

बराच काळ रखडत रखडत शेवटी आज हे पुस्तक वाचून संपवलं. रखडण्याचं कारण हे माझा आळस हे एकमेव नसून, पुस्तकात असलेली असंख्य उदाहरणं, आणि त्यांची सतत आपल्या भोवतालात लागणारी संगती, हे होतं. कुठलाही अभिनिवेश न आणता पॉप्युलर लिखाण कसं करता येतं, त्याचं हे पुस्तक एक सुरेख उदाहरण आहे. सामाजिक भाषाशास्त्राची एक बाजू सर्वसामान्य वाचकालाही रोचक वाटावी अशा पद्धतीने काही अंशी मांडण्यात हे पुस्तक यशस्वी ठरतं असं वाटलं, म्हणून त्याची इथे नोंद.

पुस्तकाची पृष्ठसंख्या फक्त 212 असली, तरी त्याचा आवाका प्रचंड मोठा आहे. असा आवाका बघून मुळात हे फार वरवरचं आणि विस्कळित लिखाण असणार, असा माझाच पूर्वग्रह झाला होता. काही अंशी विस्कळित असलं, तरीही हे लिखाण वरवरचं मात्र नाही. भरपूर उदाहरणं देऊन, पारिभाषिक संज्ञांचं अवडंबर न माजवताही सोप्या भाषेत क्लिष्ट विषय वाचकापर्यंत पोहोचवता येतो, याची पूर्ण जाणीव मूळ लेखक, आणि अनुवादक या दोघांनीही ठेवली आहे, ही या पुस्तकाबाबतीतली पहिली चांगली गोष्ट.

भाषा हे समाजाचं प्रतिबिंब आहे हा या पुस्तकाचा ढोबळ प्रतिपाद्य विषय. प्रत्येक प्रकरण उदाहरणांच्या माध्यमातून सामाजिक भाषाशास्त्राच्या त्या काळच्या (1987 चं प्रकाशन) प्रचलित धारणा उकलत पुढे सरकतं. ही उदाहरणं कुठल्याही विशिष्ट दिशेने झुकणारी नाहीत. निरनिराळ्या तटांच्या आडून तटस्थपणा मिरवणारा आततायीपणा या पुस्तकात नाही. कुठच्याही भाषेबद्दल भाषाशास्त्राच्या दृष्टीने बोलताना बोलताना अत्यावश्यक असणारा भावनिक अलिप्तपणा या सर्व उदाहरणांमध्ये दिसतो. आणि तरीही, त्या त्या परिस्थितीचं विश्लेषण कोरडेपणाने न करता सहृदयपणे केलेलं आहे. ही सहजपणे साधली गेलेली कसरत ही या पुस्तकाबाबतची दुसरी चांगली गोष्ट.

भाषेमुळे संघर्ष होतात, भाषेवरून संघर्ष होतात, आणि भाषा वापरून संघर्ष होतात. या तिन्ही प्रकारच्या संघर्षांना स्पर्श करणाऱ्या या पुस्तकाचे तीन मुख्य भाग आहेत. ही युद्धं सुरू कशी होतात, लढली कुठे जातात, आणि ती कोण लढतात, अशी ही साधारण विभागणी आहे.

पुस्तकाची सुरुवात होते, ती मानवी भाषेच्या उगमाबद्दल असणार्‍या विविध शास्त्रांमध्ये असणार्‍या मतमतांतरांपासून. भाषा निर्माण होणे, ही सामाजिक गरज असावी, असं मत मांडून पुढे एखाद्या विशिष्ट भाषेबद्दल ती उच्च असल्याच्या धार्मिक धारणा कशा निर्माण होतात, त्यावर लेखक चर्चा करतो. त्यापुढे एकूणच समाजात उच्च आणि नीच भाषा हा संघर्ष कसा निर्माण होतो, याची एक झलक पुढच्या दोन प्रकरणांत मिळते.

पुढचा भाग हा वाचकाला खरा रंगवून ठेवतो, कारण आतापर्यंत कुठेतरी घडणारी ही भाषिक युद्धं आपल्या आसपास दिसू लागतात. अनेक भाषांची सरमिसळ असलेल्या समाजात राहतं घर हीच एक युद्धभूमी म्हणून आपल्यासमोर येते. बाजार ही दुसरी युद्धभूमी, आणि तिथे आपण कोणती भाषा वापरतो यावरून आपण युद्धात कुठे उभे आहोत हे दिसू लागतं. अर्थात, हे मी जेवढं लिहिलं आहे, तेवढंही सनसनाटी पद्धतीने इथे रंगवलेलं नाही. हे पुस्तक अत्यंत संयत पद्धतीने याची मांडणी करतं, आणि याकडे बघण्याची डोळस दृष्टी हळूहळू तयार करत जातं.

या पुस्तकाचा तिसरा भाग म्हणजे तर दारुगोळ्याच्या कोठाराची सुरक्षित हाताळणी आहे. यात भाषिक धोरण हा विषय येतो. हे धोरण ठरवणं, म्हणजे मुळात भाषेच्या नैसर्गिक विकासात कोणत्या तरी प्रकारे हस्तक्षेप करणं- त्यामुळे या विकासाचं अलिप्त निरीक्षण आणि मांडणी या भाषाशास्त्रीय मूलधारणांच्या काहीशा विरोधात जाणारं हे क्षेत्र आहे. मात्र, हे धोरण कोणकोणत्या प्रकारे ठरवलं जातं, आणि त्याचे कसे परिणाम होऊ शकतात हे, आणि त्याचप्रमाणे हे धोरण शक्य तेवढं सर्वसमावेशक कसं होऊ शकेल हे, याचा विचार करणं सामाजिक भाषाशास्त्रात क्रमप्राप्त आहे. भाषिक धोरण हा विषय कोणत्या ना कोणत्या प्रकारे कायमच अस्तित्वात असला, तरी भाषेला जोडल्या गेलेल्या सामाजिक संवेदनांमुळे या विशेष आखल्या गेलेल्या धोरणांद्वारे केल्या जाणार्‍या हस्तक्षेपाला अर्थातच अनेक अर्थ असतात.या भागात लिखाणाच्या, शब्दनिर्मितीच्या आणि प्रमाणीकरणाच्या पातळीवर ही धोरणं कशी ठरवली जातात याचा उहापोह आहे. याआधीच्या दोन्ही भागातही सतत उल्लेख झालेला वसाहतवाद इथे अगदीच केंद्रभागी येऊन उभा राहतो. वसाहतवाद्यांनी लादलेल्या भाषा नाकारणे, ही अनेक नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांची निकडीची गरज होती. या नाकारण्याने झालेली प्रशासकीय गैरसोय भरून काढणे, ही सुद्धा अशीच लगेच उपाय शोधावा लागणारी गरज. त्यावर कशा प्रकारचे तोडगे काढले गेले, यावर या भागात बरीच चर्चा आहेच, पण अशा लादल्या गेलेल्या भाषांचं क्षेत्र आकुंचित झाल्यावर त्यांच्यात काय बदल होतो, त्यावरही आहे. अनेक भाषा असल्याने काय प्रश्न निर्माण होतात त्याची आपल्याला कल्पना असतेच, पण एकाच भाषेत होऊ शकणार्‍या समस्या कशा मांडल्या आहेत ते दाखवायला, आणि एकूणच उदाहरणांची मांडणी कशी आहे ते दाखवायला हे एक वानगीदाखल:

नॉर्वेमध्ये एकच भाषा असूनसुद्धा तिथे काय प्रकारच्या समस्या आहेत, त्यावर सविस्तर माहिती दिलेली आहे. Bokmal/nynorsk असे सध्याचे वादाचे दोन केंद्रबिंदू आहेत. ढोबळमानाने त्यातली पहिली पुस्तकी, उच्चवर्गाची भाषा, आणि दुसरी ग्रामीण/श्रमिक वर्गाची भाषा. या दोन्ही एकत्र होऊन एक नॉर्वेजियन प्रमाण तयार होईल, असं एक तिथलं आशावादी स्वप्न आहे. यातल्या bokmal ला तिथल्या आजवरच्या डाव्या सरकारांचा विरोध, ती उच्चभ्रू लोकांची भाषा असल्याने. Nynorsk ही ग्रामीण, त्यामुळे इतर भाषांचं मिश्रण नसलेली जास्त शुद्ध Norwegian, असा त्यांचा मुद्दा आहे. त्यामुळे डाव्या विचारांच्या सरकारात Nynorsk चं प्रतिनिधित्व भरपूर आहे, आणि Bokmal ला डोक्यावर चढू न देण्याचा आटोकाट प्रयत्न चालू असतो. 'माय फेअर लेडी'चं जेव्हा तिथे भाषांतर झालं, तेव्हा प्रोफेसर हिगिन्सची भाषा म्हणून Bokmal, आणि एलायझा डूलिटलची भाषा म्हणून Nynorsk वापरली गेली. आणि त्यावर स्वतः भाषांतरकाराची टिप्पणी अशी होती, की Norway मधल्या परिस्थितीत प्रोफेसर हिगिन्सना एलायझा डूलिटल कसं बोलावं याचे धडे देत असेल, कारण इथे हिगिन्स नाही, तर एलायझा भाषिक धोरण ठरविणाऱ्या लँग्वेज कमिशनवर आढळेल!

अशा उदाहरणांमुळे या तिन्ही भागांत झालेल्या चर्चांचा कंटाळा येत नाही. पुन्हा यातले बरेच विषय इतके आपल्या नेहमीच्या पाहण्यातले असतात, की पुन्हा पुन्हा एखादं आपल्या भोवतालचं उदाहरण आठवतं. मात्र, या उदाहरणांच्या प्रचंड संख्येमुळे कधी कधी दमायला होतं. यातून निघणारे पॅटर्न आपल्याला आकळत जातात, पण प्रत्यक्ष पुस्तक एक पॉप्युलर लिखाण असल्याने त्यात या दृष्टीने फार काही विवेचन नाही. त्यामुळे वाचताना विस्कळितपणा जाणवत राहतो. या बाबतीत पार्श्वभूमी नसणार्‍या एखाद्याला हे अतिशय कंटाळवाणं वाटू शकतं. मात्र, एखाद्या भाषिक संघर्षाला तर अनेक अर्थ असतातच, पण कुठच्याही संघर्षाला एक भाषिक पदरही असतो, याची जाणीव ठसवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे, असं मला वाटतं.

Comments

Popular Posts