लच्छी आणि मोर: पु. शि. रेंगेची सावित्री
काही पुस्तकं का आवडतात ते सांगणं कठीण असतं. एकदा सगळी कथा कळल्यावर पुन्हा काय वाचायचं, हा प्रश्न येणं स्वाभाविकच. पण अनेक आरसे, आणि अनेक दिवे घेऊन भेटणाऱ्या आनंदभाविनी 'सावित्री'ची पत्रं पारायणं करून वाचली आहेत, ती फक्त कल्पनाविस्तार पहाण्यापुरती नव्हे. एखाद्या शांत रात्री मला ती खरी वाटत जातात, किंवा खऱ्या अर्थाने उमजत जातात. तिच्या राजम्माच्या रचून सांगितलेल्या कथांइतकी खरी. ही छोटी पत्ररूपी कादंबरी वाचायला जो काही अर्धा तास लागतो, त्यात नितळ मनाची साऊ काळाचा एकेक पदर उलगडत जाते. अल्लडपणा, गांभीर्य, अधिरेपणा, संवेदनशीलता, आणि सगळ्या भावभावनांच्या आंदोलनांमध्ये ठाम असलेलं आत्मभान. ही पत्रं वाचताना सावित्रीसारखी मैत्रीण असावी असं वाटतं, आणि तेव्हा लगेच ती लच्छी आणि मोराची गोष्ट आणि तिचं वाचकावर सोडलेलं तात्पर्य नव्याने भेटतं.
आपला स्वतःशी होणारा संवाद शब्दांमध्ये उतरवता येणं, आणि त्याला पलीकडून तसाच प्रतिसाद झंकारणं, हे दुर्मीळ सुख आहे. त्याला साचेबद्ध प्रेमात न बसवता मुक्त विहरू देणं ही परिपक्वता या पत्रसंवादामध्ये दोघांनीही दाखवल्याचं दिसतं, त्या तिच्या जिवलगाची पत्रं वाचता येत नसली तरीही ते समजतं. परिपक्वतेच्या थियरीचं उदाहरण म्हणून हे उत्तम आहे. वास्तवात असं होईल का? सावित्री मला पुन्हा एकदा विचारात पाडते.
तिच्या आयुष्यातील प्रत्येक पात्र सशक्तपणे उभं राहतं या पत्रांमधून. फारसा फापटपसारा न मांडल्याने डोळ्यांसमोर दिसणाऱ्या व्यक्तिरेखा ठळक होणं सोपं जातं. आप्पा आणि एजवर्थांचं चिंतन आणि त्यावरचं सावित्रीच्या नजरेतून होणारं भाष्य, हा या पत्रांमधला अजून एक स्तर. सातव्या पत्रामधली 'अनुभवा'संबंधीची वाक्यं इथे देण्याचा मोह आवरत नाही.
'नवीन वस्तूचा किंवा प्रसंगाचा आपण 'अनुभव' घेतो-म्हणजे मागून पुढं जात असतो. घेतलेला 'अनुभव' म्हणजे सध्यांच्या स्थितीतून मागं जाऊन स्मरणाच्या सहाय्यानं काढलेला आलेख. दोन्ही प्रकारांत वर्तमान अस्तित्व लक्षातच घेतलं जात नाही.'
अनुभव ही झपाटून विकत घेण्याची गोष्ट झाल्याच्या माझ्या मनात डोकावणाऱ्या भीतीला सावित्री आप्पांच्या माध्यमातून एक तात्विक बैठक देते. या अनुभवासंबंधीचं अखंड चिंतन, आणि वर्तमानात जगून त्याचे उपयोजन करणारी सावित्री.
स्वार्थी न बनताही स्वतःच्या सुखाचा केंद्रबिंदू स्वतःतच शोधता येतो, या साध्या, पण सहजसाध्य नसणाऱ्या तत्वाकडे त्या पहिल्या मोराच्या गोष्टीपासून सावित्री अलगद घेऊन जाते. कधी आपल्या कोशात रमलेली, तर कधी उत्साहीपणे जगाच्या दळणवळणात सहभागी होणारी साऊ कधीच कशात रुतलेली नाही. तसं पाहिलं तर केवढ्या उलथापालथी घडतात तिच्या आयुष्यात. प्रतिसाद मिळूनही अनिश्चित टांगणीवरचं भविष्य असणारं नातं, सगळ्या जवळच्या नात्यांना काळाने हिरावून नेणं, घरापासून दूर, महायुद्धात उद्ध्वस्त होणाऱ्या जपानमध्ये ऐन युद्धकाळात अडकणं, कशाची शाश्वती नाही असं आयुष्य. ती अलिप्त नाही. या सगळ्या घटनांचे तरंग उमटतात तिच्या मनावर. पण तेवढंच. यातल्या कशानेही तिच्या मनाचा तळ ढवळून निघत नाही. आणि हे काहीच ओढून-ताणून नाही. वाहत जाणं, हा तिचा सहज गुण आहे. तिच्यात सगळं विरघळतं, ती सगळ्यात विरघळते. संपूर्ण समर्पणाच्या संकल्पनेला मला कधीकधी आत्मघातकीपणाचा वास येतो. ज्याच्यात सामावून जाते, त्या सगळ्याला उजळून टाकणारं समर्पण हिला कसं जमलं असेल?
शेवटच्या पत्रापर्यंत ती पुन्हा एकदा जिथून सुरुवात केली त्याच स्थळी परतली असली, तरी तिच्या अनुभवांनी स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. मोराला अंगणात बांधावंसं वाटणाऱ्या लच्छीपासून मोराची वाट न बघता नाचणाऱ्या सावित्रीपर्यंतचा प्रवास, म्हणजे तिच्या आप्पांच्या Experience:Growth चं ससंदर्भ स्पष्टीकरणच.
Comments
Post a Comment