एक्झेलेशन- पुस्तक परिचय


टेड चियांगच्या या आधी वाचलेल्या (Stories of your life) पुस्तकाची तोंड फाटेस्तोवर स्तुती केल्याने नवीन वाचायला घेतलेल्या पुस्तकाकडून तेवढ्याच अपेक्षा होत्या. ‘Exhalation’ या नवीन पुस्तकाने निराशा केली नाही, पण खूप प्रभावही पाडला नाही. मुळातूनच उंचावलेल्या अपेक्षांमुळे असेल कदाचित, पण यावेळी भारावून जाणं कमी प्रमाणात झालं. पण तरीही, माझ्या वैयक्तिक आवडीनिवडीमुळे सध्याच्या सर्वात आवडत्या कथालेखकाच्या पुस्तकाची नोंद करायची राहून जायला नको, म्हणून ही पोस्ट.

एकूण नऊ कथांचा हा संग्रह आहे. या लेखकाच्या कथांचं सूत्र, त्यामागची कल्पना काही फार भयंकर नाविन्यपूर्ण नसते. आपल्याला माहिती असलेल्या जगाचे मूलभूत नियम वाकवून निर्माण केलेल्या काल्पनिक जगात याच्या कथा घडतात. परग्रहवासी संस्कृती, काळ वाकवण्याची शक्ती, अत्यंत प्रगत तंत्रज्ञान, समांतर विश्व  वगैरे हॉलीवूडला रोजीरोटी पुरवणारे विषयच याच्या कथांमध्ये आहेत. पण त्याच्या कथांना वेगळेपण मिळतं ते या विषयांच्या त्याच्या हाताळणीमुळे. काहीतरी घटना घडली, आणि आता जगाला वाचवण्याची वेळ (शक्यतो अमेरिकन) कुणावर तरी आली असे ठराविक धक्के त्याच्या कथांमध्ये मिळत नाहीत. नवीन कथा वाचायला सुरुवात केली, की तुम्ही असाल तिथून या वाकवलेल्या नियमांच्या जगात तो तुम्हाला अलगद खेचून नेतो. त्या जगाचे एकदा तुम्ही रीतसर सदस्य झालात, की मग तुमच्या मनात माणूस म्हणून मुळातच चालू असलेली द्वंद्वं घेऊन तिथली पात्रं तुम्हाला भेटत जातात. तुम्ही स्वतःला तपासू लागता. त्याच्या कथा वैज्ञानिक चमत्कृतीचं नाविन्य संपतं तिथे सुरू होतात. या पुस्तकात नऊ कथा आहेत म्हणण्यापेक्षा  त्याने एकूण नऊ समांतर विश्वांमध्ये वाचकाला अंतर्बाह्य ढवळून काढलेलं आहे, असं म्हणणं जास्त योग्य ठरेल.

या सर्व कथांमधला समान धागा म्हणजे प्राप्त परिस्थितीत त्यातील पात्रांना घ्यावे लागणारे निर्णय, आणि त्यांचे परिणाम. वाचताना केलेल्या कर्माच्या व्यस्त प्रमाणात मिळणारं फळ हा विचार प्रत्येक कथेत इतका ठळकपणे दिसला, की माझ्या भारतीय मनाला भगवद्गीता आपसूक आठवणारच होती. आपण एखादा निर्णय घेतो आणि तो पार पाडतो. तो तसा घेतला नसता तर काय घडलं असतं, किंवा एखाद्या विशिष्ट निर्णयामुळे नक्की काय बदलत गेलं याची प्रत्यंतरं या कथांमधल्या पात्रांना येतात. मग ती कालप्रवास करून असतील, समांतर विश्वातील आपल्या रूपांशी संपर्क साधता येण्याच्या तंत्रज्ञानामुळे असतील, किंवा नव्याने झालेल्या एखाद्या जाणि‍वेने असतील.

आपला एखादा कशानेच धक्का लागू न शकणारा स्वभावाचा गाभा असतो, का आपली प्रतिमा बाह्य गोष्टींनी सतत बदलत जाते याबद्दल सतत तळ्यात मळ्यात उड्या मारायला लावणं ही अजून एक या कथांची खासियत. गाभा सापडण्याच्या अपेक्षेने एखादा कांदा सोलत राहावा, आणि नुसत्याच त्याच्या पाकळ्या हाती येत राहाव्यात अशा या चर्चा आहेत. तसंच, स्वतःबद्दलच्या आपल्या धारणा आणि जगाबद्दलची आपली दृष्टी हे दोन्ही एकत्र वळून झालेला सुंभ जळतो तेव्हा नेमका कसला पीळ शिल्लक राहतो, हा याच्या पात्रांना सतत पडणारा प्रश्न. वैज्ञानिक पद्धतींनी देवाचं अस्तित्व सिद्ध केलेल्या जगाची कल्पना यात एका कथेत आहे. धर्मवाद आणि विज्ञानवाद हे एकमेकांना सर्वार्थाने पूरक असलेल्या या जगातही अस्तित्वाचे काय प्रश्न पडू शकतात याची कल्पना काहीशी घाबरवून सोडते.

प्रत्येक प्रकारच्या प्रगतीची किंमत मोजल्याशिवाय तिचे फायदे मिळू शकत नाहीत, याची नव्याने जाणीव प्रत्येक कथेत होते. सत्य नोंदवून ठेवण्याच्या पद्धतीमुळे सत्याची आपली संकल्पना बदलते का, याचा विचार एका कथेत आहे. जशीच्या तशी नोंदवून ठेवलेली घटना म्हणजे सत्य, का सत्यालाही आपले असे पदर आहेत आणि त्यात आपण विश्वास कशावर ठेवायचा हे असंच पुन्हा गोंधळवून टाकणारं काहीतरी. निरपेक्ष सत्य आणि सापेक्ष सत्य यातील प्रत्येकाची आपण काय किंमत मोजतो आणि त्यातून काय मिळतं हे कथाबीज अनेक सापेक्ष सत्यांच्या दुनियेत तसं क्रांतीकारीच म्हणायचं.

सर्वसामान्यपणे विज्ञानकथा म्हणून ज्या काही वाचनात आलेल्या आहेत, त्यात वैज्ञानिक प्रगती ही प्रश्नांची उत्तरं देणारी असं चित्र रंगवलेलं असतं. आपली मती कुंठित होते तिथेच, त्याच वेळी काहीतरी नवीन घडतं, काहीतरी पुढचं पाऊल पडतं. त्यातून एखादी नवीन दिशा मिळते आणि सगळं आलबेल होऊन जातं. टेड चियांग या सगळ्या नवीन दिशा आपल्यासमोर प्रत्यक्ष उभ्या करतो, आणि आपल्यासमोर मुळातल्या प्रश्नासाठी त्या किती फोल आहेत तेही सिद्ध करतो. कितीही धावलो तरी एकाच जागी आणि एकाच वर्तुळात आपण धावतो आहोत ही जाणीव करवून देणं हेच त्याच्या कथांचं फलित. बाकी त्याच्या कथांना निश्चित उत्तरं सहसा नसतात, आणि त्या आश्वस्त करण्यापेक्षा अस्वस्थ करून टाकतात. त्यामुळे कुणी मुद्दाम जाऊन त्या वाचाव्यात अशी शिफारस मी करणार नाही. मात्र, ज्यांना अस्तित्व आणि प्रयोजनाचे प्रश्न पडतात त्यांचा या कथा त्यांच्या स्वतःशीच उत्तम संवाद घडवून आणू शकतात. त्या संवादाची आस असणार्‍यांना या कथा नक्कीच आवडतील असं मला वाटतं.




Comments

Popular Posts