मला भेटलेली हंपी
या जागेबद्दल मी काही वेगळं सांगावं, आणि कुणी काही मुद्दाम ऐकावं असं शिल्लक नाही. जुन्याचा सोस असलेल्या शहरात आणि माणसांत मी राहते. त्यामुळे या भागांच्या ऐतिहासिक महत्वाची इत्थंभूत माहिती ओळखीच्या अनेकांना पाठ आहे. आणि तशी मी Instagram पिढीमधली. त्यामुळे इथल्या फोटो-व्हॅल्यू वर भाळलेले लोकही मित्रकंपूत अनेक. त्यामुळे या भागाबद्दल सांगायचं माझं असं काही नाही. मात्र, मला स्वतःला बाजूला केलं, तर या ट्रिप च्या संदर्भात दिसलेल्या, भेटलेल्या अनेक हौशा, नवशा, गवशा लोकांच्या नजरेतून मला जे दिसलं ते मात्र डोक्यात आहे तिथवर उतरून काढावं असं वाटलं.
या भेटण्याची सुरूवात होते ती काहीतरी वाचून, ऐकून जावं म्हणून पाहिलेल्या व्हिडिओज पासून. काही खास मराठी ग्रुप्स वर अनेकांनी सुचवलेले व्हिडीयो पहायचा प्रयत्न केला. मात्र, त्यात माहितीपेक्षा फापटपसारायुक्त अभिनिवेश जास्त जाणवायला लागल्यावर प्रयत्नच बंद केला. गोवा ते होस्पेट या प्रवासात मग अभिनिवेश-रहित व्हिडिओ शोधणे असा एक मुख्य कार्यक्रम झाला. हंपी एकाच वेळी आकर्षक, आणि तरीही ठसठसणारी कशी वाटते, हे या शोधाशोधीत जाणवू लागलं होतं. शेवटी एकदाचं स्टेशनला लागेपर्यंत काय पाहायचं आहे, त्याची सर्वसाधारण रूपरेषा आखता आली. पण, तसं प्लॅननुसार काही होणार नव्हतं. त्या जागेचं गारूड वेगळं आहे.
तिथे उतरल्यावर भेटू लागली माणसं. आम्हाला भेटलेला रिक्षावाला तिथल्या विरूपाक्षाचं नाव मिरवणारा होता. रखरखीत प्रवासातून अर्धमेल्या होऊन आलेल्या आम्हाला त्याने धडाधड त्याचा हंपीदर्शन प्लॅन विकला, आणि माझा प्लॅन तेव्हाच बासनात गुंडाळून ठेवला गेला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे 'सनसेट पॉईंट' पाहायला गेल्यावर मला व्हिडिओ आणि माहितीच्या पलीकडील हंपी दिसू लागली. माणसांचा महापूर, Time lapse, slow mo अशा शब्दांचा एके ठिकाणी जप, आणि मागे देवळात रामनाम संकीर्तन! संगम बंधूंनी वसवलेल्या या खडकाळ भूमीच्या नगरात जुने-नवे प्रवाह कसे बेमालूमपणे मिसळत जातात याची ही पहिली चुणूक म्हणायची.
दुसर्या दिवशी मातंग टेकडीवरून पुन्हा एकदा नवं लेपलेलं जुनं जग सापडलं. रामायणात ऐकलेल्या या जागा इथे सतत सापडत राहतात, आणि त्या नॉस्टॅल्जिक भावनेत जुन्याशी जवळीक कदाचित हुळहुळू लागते. शतकानुशतकं एकमेकांत गुंतून साचत गेलेले संस्कृतींचे थर निर्विकारपणे ज्याने पाहिले, तो सूर्य उगवताना तिथे चार दिवस फिरायला आलेला एक नवीनतम थर कॅमेरे सरसावून सज्ज असतो. कुणी डॉक्युमेंटरी करणारे अन्य कॉलेजच्या फोटो काढणार्या लोकांकडे तुच्छ कटाक्ष टाकत असतात. कुणी आम्ही कित्ती ट्रेकिंग करतो ते सांगणं आवश्यक वाटणारे महाभाग त्यात असतात. बहुतांशांना आपण इथे आलो आहोत, हे शेअर करण्यासाठी उत्तम फोटो काढायची चिंता सतावत असते. आणि 600-700 वर्षांपूर्वी काढलेले पाण्याचे पाट, त्यावर अजून फोफावणाऱ्या बागा, त्यांच्या परिसराला जोडून असणारी मंदिरं, आणि हे सर्व त्या वैराण भागात घडवून आणणारी तुंगभद्रा आळोखेपिळोखे देत जागे होत असतात.
यानंतर जी ठिकाणं पाहिली, त्यात पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे मी सांगण्यासारखं काहीच नाही. घोडे, उंट, त्यांना सांभाळणारे स्थानिक नसणारे लोक, अशी दगडात कोरलेली संस्कृतींची सरमिसळ एके ठिकाणी दिसत असते. आणि पर्यटकांची गर्दी, आणि त्याभोवती गुंफलेली तिथली व्यवस्था अशी जिवंत सरमिसळही दिसत राहते. एके काळी प्रचंड समृद्ध असलेल्या त्या नगरीचा झालेला विध्वंस आतून कुरतडून टाकत असतो. त्या विध्वंसाच्या भोवती तिथे आत्ता उभी झालेली व्यवस्था अंगावर येत राहते.
आमचा रिक्षावाला आता त्याला पाठ झालेली ठिकाणं आणि त्यांचं महत्व यांची रेकॉर्ड दरवेळी वाजवतो. मात्र, हे सर्व बाहेरच्या लोकांसाठी, टुरिस्टांसाठी. त्याला अनेक वेळा अनेक प्रकारे विचारूनही तिथल्या स्थानिक लोकांची हंपी त्याने आमच्यापासून दडवून ठेवल्याचं जाणवत राहतं. तो जेवायला-खायला घेऊन जातो त्या प्रत्येक ठिकाणी अर्थात त्याची ओळख असते. फिरायला आलेल्या लोकांना त्यांच्या अनुभवी नजरा सतत जोखत असतात. इथे प्रत्येक व्यावसायिकाची insta page आहे. प्रत्येकाला कोणत्या फोनमधून, कोणत्या मोडमध्ये कसे फोटो येतात हे माहीत आहे. कुठून आलेल्या लोकांना काय पाहिजे असतं, याची त्यांची गणितं निश्चित आहेत. जुन्या ओळखी-नाती यांच्या या व्यावसायिक जाळ्याच्या प्रत्येक कोपर्यात चार दिवसांसाठी आलेले पाहुणे नेऊन आणले पाहिजेत, हे आमच्या रिक्षाचालकाचं वर्तमान हंपीच्या व्यवस्थेशी पक्कं असलेलं इमान असतं. या नव्या हंपीने जुन्या हंपीची कात कधीच टाकून दिली आहे. ती टाकून दिलेली कात पाहायला येणारे बाहेरचे लोक, हाच काय तो तिचा आणि यांचा संबंध. अजून एक थर असा उकलतो.
काही सूर्योदय, काही सूर्यास्त, आणि मध्ये तिथल्या त्या अदृश्य जाळ्यात इथून तिथे फिरत राहिला, की माणूस पुढच्या प्रवासाला लागतो. फोनमध्ये खूप फोटो असतात, बॅगमध्ये कदाचित तिथले काही अक्षरं छापलेले कपडे असतात, खूप इतिहास पाहून आलो असं कदाचित भारावलेपण असतं. तरीही, तिथल्या ग्रॅनाईटच्या प्रचंड शिळा, तिथली स्थानिक माणसं, आणि तिथली तुंगभद्रा यांनी संगनमत करून अनेक गुपितं दडवून ठेवलेली असतात. व्हिडिओ, माहितीपुस्तकं, आणि फोटो, यातून उघडून टाकलेली काळाच्या उदरातून खोदून काढलेली हंपी तेवढी त्यांनी टुरिस्ट लोकांसाठी राखीव ठेवलेली आहे. सुट्टी लागली की एक लाट येते, मागे सरते. पुन्हा दुसरी आली की तीही मागे जाते. हंपी विरूपाक्षाच्या देवळातील हत्तिणीसारखी झुलत राहते, लोकांच्या फोटोंमधून सर्वदूर प्रसिद्ध होत राहते. आणि तिच्यावर अंकुश चालतो, तो फक्त काळाच्या माहूताचा.
-ऋता
Comments
Post a Comment