माटोळी

माटोळीच्या सामानाने बाजार खच्चून भरला कि खरा 'चतुर्थी fever ' गोव्यात दिसू लागतो.एरवी मानवनिर्मीत वस्तूंनी व्यापून टाकलेला बाजार भाद्रपदातल्या शेतांइतकाच हिरवागार,तृप्त दिसू लागतो..माटोळी खरं तर रानात जाऊन,सगळी फळं ,फुलं स्वतः शोधून आणून सजवायची असते म्हणे.पण म्हणून काय झालं ?बाजारातून का होईना,परंपरा तर मोठ्या उत्साहाने जपली जातेय ना ..आणि या मोठ्या बाता जाऊच द्या..अशा बाजारातला एक फेरफटका मनाला ताजतवानं करून टाकतो एकदम..

माटोळी म्हणजे काय ते गोवेकरांना सांगायलाच नको.गणपतीसमोरच्या सजावटीत एकदम प्राण ओतून टाकणारी ती फळं -फुलं मिरवणारी लाकडी चौकट म्हणजे माटोळी.पाऊस पिऊन तृप्त झालेल्या धरणीने दिलेला आशीर्वाद म्हणजेच माटोळी म्हणा ना ..गणपतीच्या दिवसांत सापडणाऱ्या रानटी फळांना एकमेकांजवळ खच्चून बांधलं  जातं.किती प्रकारची असावीत हि फळं ?मागच्या वर्षीच्या माटोळी स्पर्धेतील विजेत्याने जवळपास ३२५ फळं बांधली होती!याचा उत्साह न्याराच.आजच बाजारात कित्येक लोक सगळं सामान खरेदी करताना किती उत्साहात होते..ती न्यायची,ती बांधायची,चढवायची,आणि मग येणाऱ्या प्रत्येकाकडून या सगळ्या जीव ओतून केलेल्या मेहनतीचं कौतुक ऐकून धन्यता मानायची.मी आणि माझा भाऊ लहानपणी दूर्वा गोळा करून येताना अनोळखी लोकांच्या घरच्यापण माटोळ्या बघून,मोदक-करंजी (चुकलं -नेवरी ) खाऊन  यायचो. माटोळी म्हणजे निखळ आनंद एवढेच मनावर कोरले गेलेय .

जरा विचार केला तर लक्षात येतं कि हि किती सुंदर कल्पना आहे..गणपती मातीतून आलेला देव.त्याला त्याच मातीतून उगवलेल्या वस्तूंनी सजवायचा.असे करताना आपल्या आसपासच्या रानातील झाडांची माहिती करून घ्यायची.त्यांचा कलात्मक वापर करायचा..'go green' चा अर्थही माहित नसलेल्या पिढ्यांनी माटोळी जपलीये,आणि अक्षरशः फुलवलीये  आणि फळवलीये ..अजूनही ती तशीच आहे.निसर्गाचे प्रतिनिधित्व करत आनंदाने झुलत आहे ..



Comments

  1. nice one...
    Ya varshicha 'chaturthi' sathicha bazar baghun mala as vatl ki 'matoli' che saman ghenare kami ani vikanare jast hote...:D

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts