नमामि वैनगंगे!

काही महिन्यांपूर्वी डेक्कन कॉलेजच्या 'मराठी बोलींचे सर्वेक्षण' या प्रकल्पाअंतर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये जाणार्‍या फील्डवर्क गटासोबत मीही गेले होते. आत्ता त्याच गटासोबत चंद्रपूर-गडचिरोलीमध्ये आहे. जे भाग सहसा माझ्या महाराष्ट्रातील ओळखीच्या लोकांनाही माहिती नसतात, तिथे एका वेगळ्याच प्रकारच्या कामासाठी फिरता येत आहे हा एक भाग झाला. पण इतर अनेक हायलाईट्स मधील एक महत्त्वाची होती ती दुथडी भरून वाहणारी वैनगंगा. 

मध्यप्रदेशात उगम पावून महाराष्ट्रात वाहत जाणारी वैनगंगा. पहिल्यांदा दिसली ती भंडारा जिल्ह्यातून बाहेर पडताना. भर मार्च महिना, आणि त्यातही दोन्ही बाजूंनी नजर पुरत नाही इतकं मोठं पात्र. त्यानंतर महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर पुन्हा एकदा काहीशा कृश रूपात भेटली. सीमेच्या दोन्ही बाजूंचे व्यवहार तटस्थपणे पाहणारी तपस्विनी असावी, अशी शांत. या प्रवासात लक्षात राहिली ती शहरात आणि गावात कुठेही कशाने विचलित न होता वाहणारी ही लोकमाता. 

फील्डवर्क मागे पडलं, नवीन काहीबाही चालू राहिलं, आणि वैनगंगा विस्मरणात गेली. यावेळी अगदी शेवटच्या क्षणी यायचं ठरलं, आणि पुन्हा एकदा या भागात दाखल झाले. कोंकण आणि गोव्यापुरतं आयुष्य असलेल्या मुलीला लोकरीच्या गुंड्याच्या गुंत्यात अडकल्यासारखं वाटावं असा हा सगळा भाग. धड शहर नाही, धड गाव नाही, आणि धड जंगल नाही, असा पट्टा. पावसाच्या कामांमध्ये व्यस्त गावकरी, कोळशाच्या खाणीसाठी कापलेले डोंगर, जंगलात लावलेल्या सागाच्या ओळी आणि या सगळ्यात होणार्‍या अखंड प्रवासात दुसरं काही दिसतही नव्हतं, आणि सुचतही नव्हतं. 

चंद्रपूरमधून गडचिरोलीमध्ये येता येता अर्धवट झोपेतून एकदम जागी झाले, ती पुलावरून दिसणारी दोन्ही दिशांनी दूरवर पसरलेली कोणतीतरी नदी पाहून. पटापट आमच्या गटातल्या लोकांनी पाहून सांगितलं की हीच ती आपल्याला मागे भेटलेली वैनगंगा. एका पावसाच्या जोरदार सरीच्याही कवेत येणार नाही असा तिचा विस्तार. पावसाला कडकडून भेटून, आतून प्रदूषणाचा गाळ सुद्धा घुसळून बाहेर काढलेलं पात्र. आणि तरीही केवळ धीरगंभीर वाटणारी चिंतनशील वैनगंगा... 


या भागातील मित्र, स्वाम्या (संकेत पारधी), याने मागच्या वेळी पाठवलेली त्याची कविता पुन्हा एकदा काढून वाचली. वैनगंगेसारखीच ती नव्याने भेटली, आणि पटली - 

किती कोसावर कोनाची कहानी बदलते
नदी वायत जाते सयरात पानी बदलते

कई बदलन का रस्ता आपला वैनगंगा?
बदलते चुलबन, चन्दन अन् कठानी* बदलते

मला या भागात भेटलेल्या कहाण्या बदलल्या, पण या सर्व कहाण्या पोटात घेणार्‍या वैनगंगेने रस्ता बदललेला नाही. तिचं कुणीही कसलंही अवडंबर केलेलं नाही - कदाचित जगण्याच्या अनेक संघर्षांमध्ये नदीची कवनं रचायला वेळच शिल्लक राहत नसेल. मात्र, या भागातल्या निरनिराळ्या इतिहासांच्या आणि वर्तमानाच्या तुकड्यांच्या एकमेकांत गुंतलेल्या mosaic मध्ये सलग असा एकच रंग घेऊन ती आश्वासकपणे वाहत आहे. गडचिरोलीतून वैनगंगा सोडून जाताना एवढ्या कवित्वाची शिदोरी मला पुरेशी आहे.


*चुलबन्द, चन्दन अन् कठानी या तिन्ही वैनगंगेच्या उपनद्या आहेत. 

-ऋता

Comments

  1. ,खूप छान लिहितेस. अगदी भावस्पर्शी. उत्तम

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर लिहिलं आहेस. बाहेर जेवढ्या नद्या बघितल्या तेवढ्या भारतातल्या काय महाराष्ट्रातल्या पण नाही बघितल्या आणि वैनगंगा इतकी मोठी असेल हे तर तू सांगितल्यावरच समजलं! तुझ्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडतेय।

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts