सौर मंडलमें टिमटिम करते तारे अनेक हैं

कुठेतरी गावात गटातील इतर लोकांची वाट पाहत असताना शाळेतून घरी परत जाणार्‍या पोरींचे जथ्थे गराडा घालतात. शाळेतल्या कापणी झालेल्या गुलाबांच्या फांद्या घेऊन घरी गुलाब लावायला चाललेल्या चिमुकल्या धिटुकल्या. नवीन दिसणार्‍या व्यक्तीला त्यांना एकामागून एक प्रश्न विचारायचे असतात. गावचे सरपंच विचारणार नाहीत इतकी ही पंचायत समिती माझी माहिती काढते. शेवटी 'दोन-तीन ओळी लिवाच्या आहेत' इतका भला मोठ्ठा घरचा अभ्यास असल्याने त्यांना रंगात आलेली मुलाखत सोडून जावं लागतं.

या बागडत बागडत समोरून आलेल्या मुली मला काही क्षणांचा आनंद देऊन जातात. पण त्यांना सोडून पुढे गेलो, की डोळ्यांसमोरून इतर अनेक भेटलेल्या मुली येऊन जातात.

अठरा-वीस वर्षांच्या मुली, संसाराने पिचून गेलेल्या. डोळ्यांत कसलीतरी अखंड भीती घेऊन वावरणाऱ्या. नवीन व्यक्तीशी, ती त्यांच्या एवढी बाई असली तरी, बोलताना गांगरून गेलेल्या.

नवर्‍याची मारहाण सहन करणार्‍या. सावळ्या रंगाचा न्यूनगंड घेऊन माझ्या रंगावर पटकन काहीतरी बोलून जाणार्‍या. माझं लग्न नाही झालेलं हे कळल्यावर कधीतरी कीव येणार्‍या, आणि कधीतरी किंचित असूया डोळ्यांत तरळून जाणार्‍या. 

एका गावात भेटलेली एक ताई. मुलगी झाली म्हणून सासरच्या लोकांनी नांदायला नेलं नाही म्हणून डोक्यावर थोडा परिणाम झालेली. एका तासापुरत्या तिच्या गावात आलेल्या अनोळखी मुलीला भडाभडा सगळं बोलून दाखवणारी.

विटा भाजायला जाणारी चुणचुणीत मुलगी. तिच्या वडिलांना कळवळून मीच सांगते की शिकवा हो हिला, किती हुशार आहे. त्यावर मला उत्तर मिळतं की शिकली तर आमच्या समाजात कुणी तिच्याशी लग्न करणार नाही.

मला शाळेत शिकवायला आवडतं गं ताई, पण घरचे बीएड करू देत नाहीत. किती भांडून भांडून शिकतेय, म्हणणारी एक अजून हुशार मुलगी. 

घरातल्या बाईला बाहेरच्या व्यक्तीशी एकटीला बोलायला देऊ नये, म्हणून बाकी काहीही कर्तृत्व नसलं तरी फक्त 'घरातला पुरूष' या नात्याने तिथे येऊन कुणी बसलेला असतो. त्याला पाहून मगच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार्‍या.

'माझ्या बाबांचं घर', आणि 'माझ्या नवर्‍याचं घर' असे संपूर्ण मुलाखतीत सातत्याने उल्लेख करणार्‍या. 'माझं घर' असं कधीच म्हणू न शकणार्‍या एरवी सधन असणार्‍या बाया.

माझी अनेक प्रकारची privilege कानफटात बसावी तशी मला अनेकदा भेटत जाते. मला भेटलेल्या मुलींचं आयुष्य काही वेगळं व्हावं, असं वाटत राहतं. त्यांच्यासाठी काहीच करण्याची माझ्यात धमक नाही, हे नालायकपणही दरवेळी अधोरेखित होतं.

मग कधीतरी गावातल्या अशिक्षित सरपंच भेटतात. तुटक्या खुर्चीवर बसून त्या अधिकारवाणीने गावाची माहिती देतात.

कुणी पंचायत सचिव असते. वेळ संपूनही ती आमचं काम होईपर्यंत थांबून राहते. पंचायतीतला तिचा वचक जाणवत राहतो.

समाज बदलणं मला शक्य नाही. मला दिसला तसा मी टिपला म्हणून काही बदल होईल असं ही नाही. पण अशा सरपंच, अशा सचिव, काही आशा सेविका, अंगणवाडी सेविका, यांना पाहत पाहत कुणी यांच्यातली मुलगी मोठी होईल. मला या जिथे भेटल्या, तिथल्या कुणी नाव कमावलं, आणि ते कुठे वाचायला मिळालं, की उगाच मला अभिमान वाटेल, की कशाकशातून येऊन या पोरीने काय करून दाखवलं.

या मुलींनी, बायांनी माझे डोळे अनेक अर्थांनी उघडले आहेत. संघर्ष या शब्दाच्या व्याख्या बदलून टाकल्या आहेत.

खूप काही मिळो या छोट्या, 'लिवाच्या दोन-तीन ओळी' खूप प्रामाणिकपणे पूर्ण करणार्‍या धिटुकल्यांना... काटे आहेतच, पण त्यांच्या हाती गुलाबही फुलू देत. 






Comments

  1. वाचताना आतून गदगदून आलं! खरच या धीटूकल्याना शिक्षणाची दारे कायम उघडी असतो आणि त्या दारातून आत प्रवेश करायची संधी त्यांना मिळो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts