केपटाऊन डायरीज - भाग 2 (अग्निसुमनांचा प्रदेश)
इथल्या केपटाऊनमधल्या दिवसभरात चार ऋतू दाखवणार्या हवामानात आणि सकस पोत नसलेल्या मातीत झाडी-झुडपांचाच प्रादुर्भाव जास्त. रुक्ष, कळाहीन, मख्ख वाटत असली, तरी थंडी-पाऊस सुरू झाला तसे त्यातल्या चिमक्या कांड्यांनाही फुलांचे तुरे फुटलेले दिसले. निळ्या-जांभळ्या ते गुलाबी छटांच्या नाजुक पाकळ्या, नाहीतर मातकट- काळसर शेंडे, नाहीतर एकदम आग पेटावी असे केशरी-तांबडे झळझळीत फुलांचे रंग मॉल आणि रस्त्यांच्या गर्दीतही दिसू लागले. हत्तीच्या सोंडेवर फुलपाखरं बसावीत अशी सुरेख दृश्यं. खुरट्या झाडांचं मला आधी कधी विशेष आकर्षण वाटलं नव्हतं. पण यांच्या राठ नजाकतीच्या प्रकृतीला डोळे सरावल्यावर पदोपदी त्यांचं सौंदर्य दिसायला लागलं. केप टाऊन शहरात इथल्या इतिहासामुळे अनेक संस्कृतींची सरमिसळ जशी झालेली दिसते, तशीच एकाच दिवसात अनेक प्रकारच्या हवामानाची सरमिसळ अनुभवता येते. कमीत कमी व्याप्तीत जास्तीत जास्त वैविध्य, हा एकमेव या शहराचा स्थायीभाव म्हणता येईल. पर्वतरांगा, दोन महासागर, थोडंसं दूर गेलं की वाळवंट, असा सगळं एका जागी मिळवायला हपापलेला भाग आहे हा. या अट्टाहासाचं प्रतिबिंब केप भागातल्या अद्भुत वनस्पतिवैविध्यातह